Rajaram Bridge Tendernama
पुणे

अखेर पुणे पालिकेला आली जाग अन् मुठा नदीने घेतला मोकळा श्वास

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुठा नदीतील (Mutha River) वाहत येणारी जलपर्णी राजाराम पूल येथे अडकत असल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत आवाज उठविण्यात आल्यानंतर अखेर महापालिकेने (Pune Municipal Corporation) या ठिकाणी दोन मशिनच्या माध्यमातून जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे.

पुणे महापालिकेतर्फे मुळामुठा नदीमध्ये वाढणारी जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी टेंडर प्रक्रिया राबविली जाते. जून २०२१ मध्ये एका वर्षासाठी महापालिकेने स्पायडर मशिनने जलपर्णी काढून त्याची वाहतूक करून विल्हेवाट लावण्यासाठी एक कोटी रुपयांचे टेंडर काढले. पण ठेकेदाराकडून ठराविक ठिकाणीच मशिनचा वापर केला जात होता. मुठा नदीत केवळ संगमवाडी येथेच जलपर्णी काढली जात होती. त्यामुळे खडकवासला ते संगमवाडी या दरम्यान अनेक ठिकाणी जलपर्णी अडकून देखील ती काढण्याकडे दुर्लक्ष केले जात होते.

राजाराम पूल येथे महापालिकेकडून पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पूल बांधला जात आहे. या कामासाठी नदीमध्ये मातीचा बांध टाकला आहे. त्याला जलपर्णी अडकून बसत आहे, पण महापालिकेकडून जलपर्णी काढली जात नसल्याने तेथे ती मोठ्याप्रमाणात वाढली सिंहगड रस्ता व कर्वे नगरच्या बाजूने राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास वाढला, डासांचे प्रमाणही वाढले. तक्रारी करूनही जलपर्णी काढली जात नव्हती. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर येथील परिस्थिती समोर आली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने खास मशिन देऊन याठिकाणी जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे.

गेल्या तीन - चार दिवसांपासून येते मोठ्याप्रमाणात जलपर्णी काढून बाजूला टाकली आहे. आणखी काही प्रमाणात जलपर्णी शिल्लक आहे. पण परत काही दिवसांनी तेथे जलपर्णी वाहून येणार असल्याने नदीची कायम स्वच्छता करणे आवश्‍यक आहे. नदीत बांध घातल्याने जलपर्णी पुढे वाहून जाऊ शकत नाही, जलपर्णी वाढल्याने त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. याठिकाणी दोन मशिन लावून जलपर्णी काढली जात आहे, यापुढेही हे काम सुरू राहील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जलपर्णीची वाहतूक नाही

राजाराम पूल येथे जलपर्णी बाहेर काढल्याने तिचा ढीग लागला आहे. पण टेंडरच्या नियम व अटीनुसार जलपर्णीची वाहतूक करणे आवश्‍यक आहे. पण अद्याप जलपर्णीची वाहतूक करण्यात आलेली नाही.