Khed Shivapur Toll Tendernama
पुणे

खेड-शिवापूर टोलनाक्यावर 95 टक्के वाहनांना 'फास्टॅग' तरीही कोंडी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गेल्या वर्षभरात खेड-शिवापूर टोल नाक्यावर धावणाऱ्या फास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. सध्या खेड-शिवापूर टोलनाक्यावरून धावणाऱ्या फास्टॅगधारक वाहनांचे प्रमाण ९५ टक्के आहे, तरीही टोलनाक्यावरील गर्दीचे चित्र कायम आहे. अजूनही ५ टक्के वाहनचालक फास्टॅग नसल्याने दुप्पट टोल भरून प्रवास करत आहेत.

टोल नाक्यांवर लागणाऱ्या रांगांमुळे वेळ आणि इंधन वाया जात होते. या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारी २०२१ पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोलनाक्यांवर फास्टॅग यंत्रणा बंधनकारक करण्यात आली आहे. तर विना फास्टॅग वाहनांकडून दुप्पट टोल आकारण्यात येत आहे. सुरवातीला १६ फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत खेड-शिवापूर टोलनाक्यावर धावणाऱ्या फास्टॅगधारक वाहनांचे प्रमाण सुमारे ६५ टक्के होते. गेल्या वर्षभरात या रस्त्यावर धावणाऱ्या फास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या या रस्त्यावर धावणाऱ्या फास्टॅगधारक वाहनांची संख्या सुमारे ९५ टक्के आहे. तरीही टोल नाक्यावर अनेकदा वाहनांची गर्दी होते. सुट्टीच्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागतात. ही परिस्थिती का निर्माण होते, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

सध्या खेड-शिवापूर टोल नाक्यावर फास्टॅगधारक वाहनांचे प्रमाण सुमारे ९५ टक्के आहे. मात्र टोलवर आल्यावर फास्टॅग रिचार्ज करणे. वाहनाला फास्टॅग न लावता वाहनात बाळगणे. दुप्पट टोलची मागणी केल्यास मग वाहनातील फास्टॅग बाहेर काढणे, टोलवर आल्यास लेन बदली करणे आदी कारणांमुळे फास्टॅग असूनही टोल देण्यास उशीर लागतो. त्यामुळे टोलवर वाहनांची गर्दी होते.

- अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड