Road Tendernama
पुणे

आळंदी ते पंढरपूर रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; सरकारच्या नियमावलीचेच...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ या पालखी महामार्गाचे काम होत असताना सरकारच्या नियमावलीचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुरमाऐवजी मातीची वापर होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत असून, या निकृष्ट कामाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोईस्कररीत्या काणाडोळा करत असल्याचा आरोपही या भागातील शेतकरी करत आहेत.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांच्याकडे वारंवार संपर्क केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार या पालखी महामार्गाच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी नेमलेल्या ब्लूम एल. एल. सी. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (ता. २७)प्रत्यक्ष कामावर येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक नागरिकांनी पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये चुकीच्या कामाची ठिकाणे या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी कादबाने मळा या ठिकाणच्या कामाची पाहणी केली असता, तेथील कामांमध्ये मुरमाऐवजी माती व मोठ्या प्रमाणावर कापडी व कागदी कचरा आढळून आला. या मार्गावर असलेल्या कचरा डेपोतून हा कचरा उचलून आणल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले व संबंधित सर्व भागातील माती मिश्रित मुरमाचे नमुने हे तपासणीसाठी घेण्यात आले. त्या ठिकाणची माती, कचरा तातडीने हटविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार कंपनीला देत हे काम चुकीचेच असल्याची त्यांनी तत्त्वतः मान्यताही दिली.

तक्रारदारही हतबल
आळंदी ते पंढरपूर या रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. अगदी नांगरटीतील मातीची ढेकळे असावीत, अशा पद्धतीची माती या रस्त्याचे काम सुरू असताना टाकण्यात आली होती. त्यावेळीही संबंधित यंत्रणेकडून मातीची तपासणी झाली. सदर माती ही ‘मुरूम’ असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे तक्रारदारही हतबल झाले.

तक्रार असलेल्या ठिकाणचे नमुने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेतले असून, याबाबतचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सादर केला जाईल. त्यांच्याकडून आवश्यक त्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या जातील. या कामाबाबत ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्यांनी आमच्याशी संपर्क संपर्क साधावा.

- फारुक सय्यद, पथकप्रमुख, ब्लूम.एल.एल.सी. कंपनी

आता जरी मुरूम-मातीचे नमुने घेतले असले, तरी या नमुन्यांबाबत किती पारदर्शकपणे तपासणी होईल यात शंका आहे. गुणवत्ता नियंत्रक तपासणीचे कार्यालय जेजुरी या ठिकाणी असताना सुरू असलेले चुकीचे काम त्यांच्या निदर्शनास आले नाही का? या रस्त्याच्या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी.

- समीर कामथे, प्रत्यक्षदर्शी शेतकरी, शिवरी
-----------------------
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सूचनेनुसार ब्लूम या गुणवत्ता नियंत्रक तपासणी कंपनीने या कामाची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याबाबतचा अहवाल संबंधित कंपनीने सार्वत्रिक करावा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यावर काय कारवाई केली, हेही शेतकऱ्यांना समजले पाहिजे.

- नवनीत ल. कादबाने, प्रत्यक्षदर्शी शेतकरी, खळद