Devendra Fadnavis Tendernama
पुणे

Fadnavis अॅक्शन मोडवर! 62 कोटींचा निधी मंजूर; मग काम अडले कोठे?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : एमबीबीएस (MBBS) पदवीधारक मुलींसाठी नागपुरात 450 खोल्यांचे नवीन वसतिगृह (Hostel) बांधण्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी 62 कोटी निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, वृक्ष तोडण्याची परवानगी न मिळाल्याने वसतिगृहाचे बांधकाम सुरूच झाले नाही, अशी बातमी प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाने घेतली आहे. त्यांनी तत्काळ यासंदर्भातील अहवाल सादर करावा अशा सूचना 'मेडिकल' प्रशासनाला दिल्या आहेत.

मेडिकल हे आशिया खंडातील एक नामांकित रुग्णालय म्हणून ख्यातीप्राप्त आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकांची निवासी डॉक्टरांची संख्या असून, पदवीधारक विद्यार्थ्यांची संख्या एक हजार एवढी असते. निवासी डॉक्टरांसह येथील पदवीधारकांसाठी येथील वसतिगृह अपुरे पडत आहे. मेडिकलमध्ये तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाचे सुमारे 620 निवासी डॉक्टर आहेत. त्यांच्यासाठी असलेले वसतिगृह बांधण्याचे काम सुरू असून, 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले. मात्र अतिशय संथगतीने बांधकाम सुरू आहे.

तर एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमासाठी मेडिकलमध्ये दरवर्षी 1200 विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी पन्नास टक्के मुलींची संख्या असते. एकूण विद्यार्थ्यांच्या 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांना वसतिगृह कमी पडत आहे. त्यांना बाहेर राहावे लागते, तर काहींच्या नशिबी मेडिकलमधील नर्सिंग होस्टेलवर राहण्याची वेळ आली.

पुरवणी मागण्यांमध्ये एमबीबीएसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी 450 खोल्यांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी 62 कोटीचा निधी मंजूर झाला. वृक्ष कापण्याची परवानगी मिळालेली नाही. यासंदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयातून अहवाल मागवण्यात आला होता. तो सादर केला आहे, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली.