Mumbai Pune Expressway Tendernama
पुणे

Expressway: घाटातील कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय; 4 ठिकाणी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune - Mumbai Expressway) होणाऱ्या वाहतूक कोंडीवर विशेषतः ट्रक चालकांवर नजर ठेवण्यासाठी वीस फूट उंचीचे मनोरे उभे केले जाणार आहेत.

रायगड परिक्षेत्रात तीन आणि पुणे क्षेत्रात एक असे एकूण चार मनोरे उभे केले जाणार आहेत. याशिवाय मुंबईहून पुण्याला येताना घाटात जड वाहनांमुळे होणारी कोंडी कमी करण्यासाठी या भागात जड वाहनांना दोन लेन, तर चारचाकींना बॅरिकेड लावून एक लेन उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पेट्रोलिंगचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांचे प्रमाण घटले आहे. मात्र, सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवाशांना हा प्रवास नकोसा वाटतो आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांनी कोंडी कमी करण्यासाठी विशेषतः घाट सेक्शन आणि अवजड वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे.

घाटात अवजड वाहनचालक हे आपली लेन सोडून चारचाकीच्या लेनमध्ये घुसतात. परिणामी, चारचाकीच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. घाटातील चढण व पाठीमागे लागलेल्या वाहनांच्या रांगा हेच चित्र तयार होते. हे चित्र बदलण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू असून महामार्ग पोलिसांनी मनोरे उभे करण्याचा व लेनमध्ये तीन किमीच्या अंतरासाठी बदल करण्याचे ठरविले आहे.

येत्या एक ते दोन आठवड्यांत मनोरे उभे राहतील. शिवाय ‘एमएसआरडीसी’कडे ३०० बॅरिकेडची मागणी केली आहे. याद्वारे घाटात तीन किमीच्या परिसरात दोन लेन अवजड वाहनांसाठी व एक लेन चारचाकी वाहनांसाठी तयार केली जाईल.

येथे असतील मनोरे...
घाटात कोंडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा भाग रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येतो. बोरघाटातील मॅजिक पॉइंट, वनविभागाची चौकी, अंडा पॉइंट या ठिकाणी वीस फूट उंचीचे मनोरे असतील. तर याच भागात मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये बदल केला जाणार आहे.

कारवाई सुसाट...
अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आरटीओ प्रशासन सातत्याने कारवाई करीत आहे. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ पर्यंत सुमारे ४७ हजार ३३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सर्वाधिक कारवाई अति वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर झाली आहे. सहा महिन्यांत आठ हजार १२४ वाहनांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केले, तर लेन कटिंग करणाऱ्या सात हजार २८७ वाहनांवर कारवाई झाली आहे. परिणामी, अपघातांचे प्रमाण सुमारे ३३ टक्क्यांनी घटले आहे.

...अशी झाली कारवाई
अति वेगाने वाहने चालविणे : ८,१२४
लेन कटिंग : ७,२८७
सीटबेल्ट न लावणे : ६,६८५
चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे : ३,७२०
वाहन चालविताना मोबाईलचा वापर : ७४२
वाहन चालविताना परवाना न बाळगणे : १,५६६
विमा नसलेली वाहने : १,३९५
अन्य कारणे : १७,८१३
एकूण : ४७,३३२

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी प्रामुख्याने घाटात होते. त्यामुळे आम्ही तेथे उंच मनोरे उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत मनोरे उभे राहतील. त्यासाठी जागेची निश्चिती झाली आहे.
- रवींद्र सिंघल, अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक), मुंबई

अवजड वाहनचालकांमुळे कोंडी होते, त्यामुळे घाटाच्या क्षेत्रात तीन किमीच्या अंतरावर आम्ही लेनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या वाहनांना ओव्हरटेकिंगची लाइन ही बॅरिकेड टाकून चारचाकी वाहनासाठी राखीव केली जाईल. उर्वरित दोन लेनमधून अवजड वाहतूक सुरू राहील. येत्या काही दिवसांत याची अंमलबजावणी सुरू होईल.
- तानाजी चिखले, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस, रायगड