Traffic Jam Tendernama
पुणे

पुण्यात कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल उभारला तरीही...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : अभिनव चौकातील (नळस्टॉप) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोच्या पुलालगत दुहेरी उड्डाणपूल बांधण्यात आल्याने वाहतुक कोंडीपासून मुक्ती मिळावी अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र इथे केवळ डेक्कनकडून पौडफाट्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात विधी महाविद्यालय रस्त्यावरून येणाऱ्या हजारो वाहनचालकांना पुढे पौड फाट्याकडे जाताना अरुंद रस्त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्याचा फटका नोकरदार, विद्यार्थ्यांसह प्रवाशांनाही बसत आहे.

कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकामध्ये अटलबिहारी वाजपेयी दुहेरी उड्डाणपूल बांधून तेथील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात आला. या उड्डाणपुलामुळे डेक्कनहून पौड फाट्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. एकीकडे हे समाधानकारक चित्र असले तरी दुसरीकडे विधी महाविद्यालयाकडून येणाऱ्या वाहतुकीला त्याचा अप्रत्यक्षरीत्या फटका बसल्याची दिसते आहे.

...म्हणून होतेय वाहतूक कोंडी
स्वातंत्र्य चौकापासून दुहेरी उड्डाणपूल सुरू होऊन पुढे एसबीआय बॅंकेजवळ खाली उतरतो. त्यामुळे डेक्कनकडून जाणारी वाहने या पुलावरून पुढे जातात. परंतु विधी महाविद्यालय रस्त्यावरून येणारी वाहने व म्हात्रे पुलावरून अभिनव चौकमार्गे येणारी वाहने पुलाखालून लागू बंधू दुकानासमोरील रस्त्यावरून येतात. दररोज सकाळी व सायंकाळी दोन्ही ठिकाणांहून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यातुलनेत पुलामुळे हा रस्ता अरुंद झाल्याने (बॉटलनेक) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विधी महाविद्यालय रस्त्यावरून सायंकाळी हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, पिंपरी-चिंचवड या भागातून पौड फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यातच शाळा, महाविद्यालये व अन्य सरकारी, खासगी कार्यालये सुटल्यानंतर या वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर पडत जाते. पुढे ही वाहतूक कोंडी दशभुजा गणपती चौकापर्यंत जाते. त्यातच पाडळे पॅलेस, महादेव मंदिराकडून येणारी दुचाकी वाहन व पाळंदे मार्गावरून येणाऱ्या चारचाकी वाहने मुख्य रस्त्यावर आल्यानंतर वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत येथील वाहतूक कोंडी फोडण्यातच वाहतूक पोलिसांचा सर्वाधिक वेळ जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

वाहतूक पोलिसांकडून पीएमपीएलला पत्र
डेक्कनकडून पौड फाट्याकडे जाणाऱ्या पीएमपीएल बसने दुहेरी उड्डाणपुलाचा वापर केल्यास वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकेल. त्यामुळे बसने उड्डाणपुलाचा वापर करावा, याबाबत कोथरूड वाहतूक शाखेने पीएमपीएल प्रशासनास पत्र पाठविले आहे.

असे करता येतील पर्याय...
- विधी महाविद्यालयाकडून येणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल यंत्रणेत बदल करून जादा वेळ देणे
- डेक्कनकडून पौड फाट्याकडे जाणाऱ्या पीएमपी बसने दुहेरी उड्डाणपुलाचा वापर करणे
- पाडळे पॅलेसकडून येणारी व पाळंदे मार्गावरुन येणारी वाहने कॅनॉलमार्गे पुढे पाठवावीत
- पाळंदे पथापर्यंतच्या पदपथाची रुंदी कमी करावी, दिशादर्शक फलक लावावेत

दुहेरी उड्डाणपुलामुळे अभिनव चौक ते पाळंदे पथापर्यंत रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच पीएमपीच्या बसही उड्डाणपुलाचा वापर करीत नाहीत. त्यामुळे विधी महाविद्यालयाकडील वाहने वाहतूक कोंडीत अडकतात. जादा पोलिस ठेवूनही वाहतूक कोंडी कमी होत नाही. त्यामुळे पदपथ कमी करण्यापासून आणखी वेगळे पर्याय शोधावे लागतील.

- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, कोथरूड वाहतूक विभाग