पुणे (Pune) : स्मशानभूमींत धूर ओढून घेऊन प्रदूषण कमी करणारी मशिन चालू किंवा बंद करण्यासाठी महापालिका (Pune Municipal Corporation) वर्षाला तब्बल ४ कोटी ६२ लाख रुपये खर्च करणार आहे. त्यापैकी जूलै २०२१ पासून आतापर्यंत १ कोटी ८६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु, दर महिन्याला हजारो रुपये पगार घेऊन स्मशानभूमींतील रस्ते साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून हे काम करून घेणे शक्य आहे. मात्र, जबाबदारी कोणी स्वीकारायची यावरून महापालिकेचे संबंधित विभाग अंग काढून घेत असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे.
शहरात महापालिकेच्या एकूण २२ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी १४ स्मशानभूमींमध्ये गेल्या सात वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून विद्युत विभागाने धूर नियंत्रण यंत्रणा (एअर पोल्यूशन कंट्रोल-एपीसी) बसवली आहे. विद्युत, गॅस व डिझेल वाहिन्यांसाठी पूर्वीपासून कंत्राटी ऑपरेटर आहेत. पण शेडमध्ये एपीसी मशिन बसविल्यानंतर ठेकेदाराकडून ऑपरेटर नियुक्त केले जात आहेत. त्यासाठी वर्षाला साडेचार कोटींचा खर्च केला जात आहे. हे ऑपरेटर कुशल किंवा अर्धकुशल कर्मचारी असणे आवश्यक आहे. पण वैकुंठ सोडून इतर कोणत्याही स्मशानभूमीत प्रशिक्षित कर्मचारी नाहीत.
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना स्मशानभूमीत मशिन चालू व बंद, कशी करायची याचे प्रशिक्षण दिले आहे. वैकुंठ वगळता बहुतांश सर्व स्मशानभूमीत एका शिफ्टमध्ये एक ऑपरेटर आहे. म्हणजे २४ तासासाठी तीन ऑपरेटर नियुक्त केले आहेत. तर एक बदली कामगार आहे. त्याऐवजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन हे काम त्यांच्याकडून करून घेणे शक्य आहे, असे महापालिकेच्या इतर विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण विद्युत विभागाने निविदांच्या हट्टापाई त्यास नकार दिला आहे. तर क्षेत्रीय कार्यालयांकडून स्मशानभूमीत पाच ते सहा कर्मचारी नियुक्त केले जातात. हे कर्मचारी फक्त रस्ते झाडतात. इतर स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे.
ठेकेदारीपद्धतीने मनुष्यबळ पुरविण्यासाठी अंदाजपत्रकात ३.३० कोटीची तरतूद आहे. विद्युत विभागाने जुलै २०२१ पासून पाच विभागात सात ठेकेदार नियुक्त केले आहेत. काहींचा कामाचा कालावधीत १८० दिवस, २७० दिवस, तर काहींचा ३६५ दिवसांचा आहे. यासाठी आतापर्यंत १ कोटी ८६ लाख ६ हजार रुपये खर्च झाले आहेत. तर २०२२-२३ वर्षासाठी २कोटी ७६ लाख ८६ हजार रुपयांचा गरज आहे.
असे चालते प्रदूषण यंत्रणेचे काम
-अंत्यविधी सुरू करण्यापूर्वी एपीसी मशिनचे पंपिंग सुरू करून लोखंडी टँकमध्ये पाणी जमा केले जाते.
-अंत्यविधीचा अग्नी पेटल्यानंतर धूर ओढून घेणारी मशिन सुरू केली जाते.
-ही मशिन २५ ते ३० मिनीटे मशिन सुरू ठेवल्यानंतर त्यातील काजळी पाण्यामध्ये मिश्रित होते.
-ही काजळी चिमनीतून बाहेर जात नाही व धुरातून होणारे प्रदूषण कमी होते.
-या यंत्रणेत ऑपरेटरला केवळ पंपिंग आणि एपीसी सुरू करण्याचे बटन ठराविक वेळेत चालू व बंद करावे लागते.
स्मशानभूमींत ठेकेदाराचे ऑपरेटर मशिन चालू व बंद करणे हे काम करतात. ते आयटीआय झालेले असणे अपेक्षीत आहे, पण अनेक ठिकाणी अकुशल कर्मचारी या कामात आहेत. तरीही क्षेत्रीय कार्यालयाकडील बिगाऱ्यांना ऑपरेटींगचे काम विद्युत विभाग देऊ शकत नाही. त्यापेक्षा प्रत्येक विभागानुसार ठेकेदाराचे कर्मचारी घेणे फायदेशीर आहे.
- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग