Eknath Shinde Tendernama
पुणे

Eknath Shinde : CM शिंदेंनी पिंपरी-चिंचवडकरांना काय दिली चांगली बातमी?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : कर्करोगावर उपचार घेण्यासाठी थेरगाव रुग्णालय परिसरात ३५ गुंठ्यांमध्ये अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्या कामाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने १२ मार्च २०२४ रोजी टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

शहरात कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याबाबत आमदार अश्विनी जगताप यांनी प्रश्न उपस्‍थित केला होता. रुग्णालय उभारण्याबाबत लोकप्रतिनिधी, नागरिकांनी मागणी केली होती.

त्यानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत शहरातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतून ‘पीपीपी’ तत्त्वावर सुरू असलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते. रुग्णालय उभारण्याबाबत आतापर्यंत काय कार्यवाही केली, अशी विचारणा आमदार जगताप यांनी केली.

या प्रश्‍नाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्‍तर दिले. ते म्‍हणाले, रुग्णालय उभारण्याच्‍या प्रक्रियेला कोणताही विलंब झाला नाही. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारख्या सामान्य कर्करोगाच्या उपचारांव्यतिरिक्त रुग्णालय समुपदेशन आणि पुनर्वसन यांसारख्या सहायक सेवाही या रुग्णालयात पुरविण्यात येणार आहेत.

रुग्णालयात फुफ्फुस, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या उपचारांच्या सुविधा असणार आहेत. महात्मा जोतिबा जन आरोग्य योजना, केंद्र सरकारची आरोग्य योजना लागू असणार आहे. सर्वांना अल्प दरात उपचार उपलब्ध होणार आहेत.