Ajit Pawar Tendernama
पुणे

अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेनंतर ठेकेदारांची संपातून माघार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पीएमपीच्या ठेकेदारांनी संपातून शुक्रवारी दुपारी माघार घेतली. पवार यांनी दोन्ही महापालिकाच्या आयुक्तांना पीएमपीची थकबाकी तत्काळ देण्याचे आदेश दिले. त्यानंतर दुपारी वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, प्रशासन आणि ठेकेदारांच्या वादात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांचे मात्र हाल झाले.

संपाची पूर्व सूचना न देता पीएमपीचे खासगी ठेकेदार मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक, मे. ट्रॅव्हलटाईम कार रेटल प्रा. लि., मे ऍंथोनी गॅरेजेस, मे. हंसा वहन इंडिया प्रा. लि., एम. पी. इन्टरप्रायझेस व इव्ही ट्रान्स यांनी संपात भाग घेतला. पीएमपीकडे सुमारे १०७ कोटी रुपयांची थकबाकी गेल्या आठ महिन्यांपासून असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. सुमारे दीड महिना पाठपुरावा करूनही थकबाकी न मिळाल्यामुळे शुक्रवारी सकाळी त्यांनी संप पुकारला. त्यामुळे सकाळी कामांवर जाणाऱ्या नोकरदारांची मोठी अडचण झाली. जवळपास ६५० गाड्या या डेपोत थांबून होत्या. तर पीएमपी च्या मालकीच्या ९८५ गाड्या रस्त्यांवर धावत होत्या. मात्र सुमारे सातशे बसेस प्रवासी सेवेतून अचानक कमी झाल्याने अन्य बसेस वर भार आला. प्रवाशांना बसची वाट पाहत थांबत राहावे लागले. तर ज्यांना बसमध्ये प्रवेश मिळाला त्यांना धक्के खातच प्रवास करावा लागला.

पीएमपीची थकबाकी बँक खात्यातही जमा

शुक्रवारी सकाळी सात वाजता कंत्राटदारांनी संप केला. त्या नंतर घडामोडींना वेग आला. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात होते. त्यांनी तत्काळ पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक घेतली. पीएमपीची थकबाकी रक्कम तत्काळ देण्याचा आदेश त्यांनी दिला. प्रशासनाने ठेकेदारांची रक्कम गुरुवारीच मंजूर केली आणि शुक्रवारी सकाळी बँक खात्यातही जमा झाली.

वेतनाच्या मुद्द्यावरून कंत्राटदारांनी हा संप केला. मात्र त्यावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही ग्रामीण भागातल्या फेऱ्या कमी करून शहरात वाढविल्या. दुपारी तीननंतर दोन्ही शहरांतील वाहतूक पूर्ववत झाली.

- डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

पीएमपीच्या ताफ्यात अतिरिक्त बस असल्याने आता यातील सुमारे २५० ते ३०० बस थेट इतर महापालिका व खासगी कंपन्यांनाच भाड्याने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यातून पीएमपीला उत्पन्न मिळून त्यांची संचलनातील तूट कमी होईल असा दावा केला जात असला तरी आणीबाणीच्या काळात किंवा बस ठेकेदारांनी संप केल्यानंतर पुणेकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पीएमपीच्या बसेस सोलापूर व कोल्हापूर महापालिकांना भाड्याने दिल्या जाणार आहेत. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायरण मिश्रा आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विक्रम कुमार म्हणाले, ‘‘पीएमपीच्या ताफ्यात २०० इ बस येणार आहेत, या लहान बस शहराच्या मध्यवर्ती भागात फिरवता येतील. पीएमपीच्या ताफ्यात २५० ते ३०० बसेस अतिरिक्त होत आहेत, त्यामुळे पीएमपीच्या स्वतःच्या सीएनजी बस इतर महापालिकांना भाड्याने दिल्या जातील, त्यातून उत्पन्न मिळेल. तर पुण्यातील आयटी कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. पीएमपीला दोन्ही महापालिका संचलन तूट देत असल्या तरी उत्पन्न वाढीसाठी पर्याय शोधले जात आहे, त्यामधूनच या बस भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपी डेपो विकसित करणे, पीएमपीमधून उत्पन्न मिळविणे यासह इतर प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत.’’