पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) अनियंत्रित उतार, टोकदार वळणे या त्रुटींसह यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ‘रेसिलंट इंडिया’ने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल महामार्ग पोलिस, आयआरबी कंपनीला देण्यात आला आहे.
या मार्गावर गेल्या जानेवारी ते एप्रिल दरम्यानच्या कालावधीत एकूण १४ अपघात झाले. यातील ९ अपघातात जीवितहानी झाली आहे. अपघातांची संख्या व नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबईचा प्रवास हा अनेकांना नकोसा झाला आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाने नेमलेल्या रेसिलंट इंडिया संस्थेने एप्रिल ते मे महिन्यांत रस्त्याचा सर्वे केला. यासाठी संस्थेने चालकांशी संवाद साधला. ड्रोनच्या माध्यमातून वाहने व चालकांवर नजर ठेवण्यात आली. रडारचाही यासाठी वापर करण्यात आला. घाटातील वळणे व तीव्र उतार देखील तपासले गेले. दोन महिन्यांच्या या सर्वेचा अहवाल नुकताच महामार्ग पोलिसांना देण्यात आला आहे.
अपघातांची कारणे कोणती?
- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील विविध त्रुटी
- जड वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे अवैध पार्किंग
- वाटेत बंद पडणारी वाहने, घाटात वाहने चालविणारे अकुशल चालक, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे
पाहणीत काय आढळले...
१. ‘आयआरबी’ने रूट पेट्रोलिंग व्हेईकल (आरपीव्ही) गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलिंग बंद केले आहे. त्यामुळे रस्त्याकडेला होणारे पार्किंग व घाटात बंद पडणारे वाहनांची माहिती मिळत नाही.
२. घाटाच्या परिसरात वाहनांचा वेग नेहमीच्या वेगापेक्षा २० ते ३० टक्के अधिक असतो. त्यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटणे, ब्रेकफेल होणे आदी असे प्रकार घडतात.
३. या महामार्गावरून दररोज सुमारे वीस ते बावीस हजार जड वाहने धावतात.
४. ओव्हरलोड वाहने तपासणारी यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित नाही.
५. गाडी बंद पडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना सतर्क केले जात नाही.
महामार्गाच्या सर्वेत आम्हाला विविध बाबी आढळून आल्या. यात विविध उणिवा आढळून आल्या असून, त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टीकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले. त्याचा अहवाल आम्ही आयआरबी व महामार्ग पोलिसांना पाठविला असून त्यात उपाययोजना देखील सुचविल्या आहेत.
- राजीव चौबे, अध्यक्ष, रेसिलंट इंडिया, नाशिक
परिवहन विभागाने नेमलेल्या संस्थेचा अहवाल मिळाला आहे. त्यात काही त्रुटी व उपपयोजना मांडण्यात आल्या आहे. त्यावर काम सुरू आहे. वाहतूक कोंडी व अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे.
- के. के. सरंगल, अतिरिक्त महासंचालक, महामार्ग पोलिस, मुंबई
एमएसआरडीसी म्हणते रस्त्यात दोष नाही
द्रुतगती मार्गात कोणताही दोष नाही. वाहनधारक वेग मर्यादेचे उल्लंघन करतात. त्यामुळे अपघात होत आहे. ‘मिसिंग लिंक’चे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच बरेच प्रश्न सुटतील, असे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.