पिंपरी (Pimpri) : महापालिकेत १९९७ मध्ये १८ गावे समाविष्ट झालीत. त्यांचा विकास आराखडा तयार केला. मात्र, विविध कारणांमुळे प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. गेल्या सात-आठ वर्षांपासून आराखड्यातील रस्त्यांची कामे सुरू झाली. पण, त्यात कोविड काळ, राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती, योग्य मोबदल्यासाठी काही जागा मालकांचा विरोध, निधीचा अभाव आदी अनेक अडथळ्यांची भर पडली. त्यामुळे कामे खोळंबली होती. आता बहुतांश अडथळे दूर झाले असून, अर्धवट रस्त्यांसह अन्य कामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या उत्तर पूर्वेकडील चिखली, चऱ्होली, मोशी, दिघी, डुडुळगाव आदींसह पश्चिमेकडील मिळून १८ गावे १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झालीत. त्यांचा विकास आराखडा तयार केला. पण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. विकास कामे संथगतीने सुरू होती. गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांना गती मिळाली. भूसंपादन झालेल्या भागात महापालिकेने रस्त्यांची कामे सुरू केली. नागरी वस्ती वाढू लागली. पण, रस्त्यांच्या कामांना कोविडचा अडथळा आला. त्यात राज्यस्तरावरील राजकीय स्थित्यंतरांची भर पडली. काहीअंशी निधी कमी पडला. काही शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळण्याची मागणी केली. त्यामुळे सुरू असलेली कामे थांबली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना पुन्हा गती मिळाली आहे. त्यामुळे समाविष्ट गावांमध्ये रस्त्याचे जाळे विणले जाऊ लागले आहे. परिणामी, वाड्यावस्त्या जोडून कनेक्टिव्हिटी वाढली आहे.
प्रमुख रस्ता ९० मीटर रुंद
शहराची पुणे आणि सभोवतालच्या औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मोशी-चऱ्होली ९० मीटर रुंद रस्त्याची आखणी तत्कालीन प्रशासनाने १९९४ मध्ये केली होती. तोही रस्ता विविध कारणांनी रखडला होता. त्याचे काम आता प्रगतिपथावर आहे. त्याची लोहगावच्या हद्दीपासून नाशिक महामार्गापर्यंतची लांबी नऊ हजार ५६३ मीटर (जवळपास साडेनऊ किलोमीटर) आहे. त्यापैकी सात हजार ८०३ मीटर (जवळपास पावणेआठ किलोमीटर) रस्ता विकसित केला आहे. चार-पाच ठिकाणी रस्त्याचे काम रखडले आहे. तोही प्रश्न आता सुटणार आहे. कारण, या रस्त्याचे उर्वरित सुमारे दोन किलो मीटर रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली आहे.
अधोरेखित काही डीपी रस्ते
- चऱ्होलीतील अंतर्गत १८ मीटर व ३० मीटर रुंद रस्ता
- मोशी, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली ९० मीटर रुंद रस्ता
- तळवडे, चिखली भागातील सात रस्ते
- चिखली, डुडुळगाव, बोऱ्हाडेवाडी, मोशी व चऱ्होली भागातील अर्धवट रस्ते
- चऱ्होली फाटा ते गाव या दरम्यान दाभाडे वस्तीतील रखडलेला रस्ता
- मोशी-डुडुळगाव रस्ता आणि इंद्रायणी नदी या दरम्यानचे डीपी रस्ते पूर्ण
‘‘महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील रस्त्यांची कामे आम्ही हाती घेतली होती. पण, मध्यंतरी कोविड काळ आणि महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यांनी सर्व बजेट डायव्हर्ट केले. त्यामुळे वर्क ऑर्डर आहेत, पण निधी नाही, अशी स्थिती होती. नंतर सरकार बदलले, त्यानंतर त्या वर्क ऑर्डरवर कोणीही काम करण्यास तयार नव्हते. पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली. काही ठिकाणी भूसंपादनास राजकीय हेतूने अडथळे आणले गेले. आता बहुतांश अडचणी दूर झाल्या असून रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी (पिंपरी-चिंचवड)