PCMC Tendernama
पुणे

'या' प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक वाटचालीला मिळणार नवी दिशा

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : ‘एज्युकेशन हब’, ‘ऑटो हब’, ‘आयटी हब’ म्हणून पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी नावारुपाला येत आहे. त्यात आता चऱ्होली आयटी पार्क, बोऱ्हाडेवाडी टाऊनशीप, मायक्रोसॉफ्टचे दोन डेटा सेंटर, इंडस्ट्रियल कमर्शियल बिझनेस सेंटर आदी प्रकल्पांची भर पडणार आहे. त्यामुळे, शहराच्या औद्योगिक वाटचालीला नवी दिशा मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत आहे. गगनचुंबी इमारती असलेले गृहप्रकल्प उभारले जात आहेत. पिंपळे सौदागर परिसर स्मार्ट सिटीतून विकसित झाला आहे. नामांकित शैक्षणिक संस्थांची शाळा, महाविद्यालये आहेत. आयटुआर (इंडस्ट्रियल टू रिसेंडेन्स) आणि आयटुसी (इंडस्ट्रियल टू कमर्सियल) अंतर्गत अनेक भूखंड हस्तांतरित झाली आहेत. तिथे वेगवेगळे बहुउद्देशीय प्रकल्प उभे राहात आहेत. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये राज्य सरकारच्या नवीन आयटी धोरणानुसार नवीन आयटी पार्क विकसित केले जाणार आहेत. त्यातील पहिला आयटी प्रकल्प चऱ्होलीतील प्राइड सिटीमध्ये मंजूर झाला आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच झाले आहे.

बोऱ्हाडेवाडीत टीपी स्किम

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार महापालिका प्रशासनाने नगररचना योजना (टीपी स्किम) राबवण्यास सुरुवात केली आहे. बोऱ्हाडेवाडी गावातील निवासी क्षेत्र वगळून टीपी स्कीम राबवण्यात येणार आहे.

चऱ्होली आयटीने रोजगाराच्या संधी

चऱ्होली बुद्रुक येथील प्राईड वर्ल्ड सिटीच्या माध्यमातून तीन दशलक्ष चौरस फूट आयटी पार्क विकसित होत आहे. सुमारे ५० हजार नोकरीच्या संधी आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल, असे ‘आयटी’चे नियोजन आहे.

चऱ्होली, मोशी, चिखली परिसर झपाट्याने विकसित होत आहे. राज्य सरकारच्या आयटी धोरणानुसार, समाविष्ट गावांमध्ये ‘आयटी’ मंजूर आहे. सध्या खासगी व्यक्तींकडून त्यांच्या पातळीवर ‘आयटी पार्क’ सुरू केले जात आहे.

- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका, पिंपरी-चिंचवड

चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉरमध्ये पहिले आयटी पार्क चऱ्होलीत विकसित होत आहे. बोऱ्हाडेवाडीतही सर्वात मोठे आयटी पार्क होऊ शकते. खराडी व तळवडे आयटी पार्क कनेक्ट होईल. विविध व्यवसाय वाढीस आयटीचा फायदा होईल.

- महेश लांडगे, आमदार, भाजप