Pune Tendernama
पुणे

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीत भर;गेल्या पावसाळ्यापूर्वी टेंडर काढूनही

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील (Katraj-Kondhwa Road) राजस सोसायटी चौकात असणाऱ्या कल्व्हर्टचे काम संथ गतीने चालू आहे. नानासाहेब पेशवे तलाव व कात्रज गुजरवाडी डोंगरातून आंबिल ओढा वाहत आहे. याठिकाणी असलेला कल्व्हर्ट अरुंद असल्याने त्यामध्ये पाणी मावत नव्हते. त्यामुळे या कल्व्हर्टचे काम हाती घेण्यात आले. याचे टेंडरही गेल्यावर्षी पावसाळ्याच्या आधी काढण्यात आल्या. मात्र, आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम चालू करण्यात आले असून, ते अत्यंत संथगतीने चालू आहे. पावसाळ्याआधी हे काम पूर्ण होण्याची शक्यता दिसत नसल्याने यावर्षीही राजस चौक तुंबण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

२५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीत फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ही कामे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे होते. पण, यंदाचा पावसाळा सुरू झालेला असतानाही प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेतलेली नाही. काम सुरू होऊन दीड महिना झाला असून, त्वरित काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने नागरिकांचे हाल होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कल्‍व्हर्टचे काम संथगतीने चालू असल्याने राजस चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कात्रज चौकाकडून राजस चौकाकडे येणाऱ्या पुलावर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे या कामाचा वाहनचालकांनाही मोठ्या प्रमाणांत त्रास होत असल्याने या कामाला गती देऊन पावसाळ्याच्या आधी हे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

कल्व्हर्टच्या कामांसाठी दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. ठेकेदाराच्या सोयीनुसार प्रशासन वागत असून नागरिकांची त्यांना काळजी नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

- प्रतीक कदम, अध्यक्ष प्रगती फाउंडेशन

सुरवातीच्या काळात चौकात जलवाहिनी, वीजवाहिन्या असल्याने काम करण्यासाठी अडचणी आल्या होत्या. मात्र, आता कल्व्हर्ट रुंदीकरणाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. पावसाळ्याच्या आधी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

- अतुल कडू, कनिष्ठ अभियंता, पथविभाग