Registration Tendernama
पुणे

दस्त नोंदणीची कोटीच्या कोटी उड्डाणे; नवा विक्रम होणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चालू आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने शिल्लक असताना दस्त नोंदणीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत ३० हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एप्रिल अखेरपर्यंत चाळीस हजार कोटींपर्यंत हा महसूल जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क खात्याच्या (Department of Registration and Stamps) नावावर महसूल जमा करण्याचा नवा विक्रम नोंदविला जाण्याची शक्यता आहे.

या विभागाकडून अनेक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रक्रिया सुलभ आणि गतिमान झाल्याने उत्पन्न वाढीचे नवे विक्रम या खात्याकडून केले जात आहे. २०२०-२१ मध्ये २५ हजार ६५१ कोटी, २०२१-२२ मध्ये ३५ हजार १७१ कोटींचा महसूल जमा झाला होता.

राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या खात्यांमध्ये दुसरा क्रमांक नोंदणी व मुद्रांक विभागाचा लागतो. चाली आर्थिक वर्षात (२०२२-२३) नोंदणी व मुद्रांक विभागाला राज्य सरकारकडून ३२ हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वर्ष संपण्यास तीन महिने शिल्लक असतानाच या विभागाने जवळपास ९४ उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या आर्थिक वर्षात आतापर्यंत १९ लाख ३५ हजार ३५६ दस्तनोंदणीतून ३० हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार अशा विविध दस्तनोंदणीचा यात समावेश आहे.

जानेवारी पहिल्या आठवड्यापर्यंत ३० हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे. हे वर्ष संपायला अजून तीन महिने आहेत, त्यामुळे हा आकडा ४० हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
- श्रावण हर्डिकर, नोंदणी महानिरीक्षक