पुणे (Pune) : लोहगाव विमानतळ ते राजभवन (Lohgaon Airport To Rajbhavan Road) या रस्ता कायमच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (VVIP) वापरला जातो. या रस्त्याचे सुशोभीकरण, दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, महापालिका (PMC) आयुक्त विक्रम कुमार यांनी ‘जी २०’ (G-20) परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली असताना हा रस्त्याची दुर्दशा समोर आली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, पादचारी मार्गावर वाढलेले गवत, अतिक्रमणे, अनधिकृत फ्लेक्स आणि घाण झालेले दुभाजक अशी अवस्था आहे. देश-परदेशातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी या रस्त्यावरून जाणार असल्याने २० डिसेंबरच्या आत हा रस्ता स्वच्छ करा, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेने ही तयारी कागदावर केली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. महापालिका आयुक्तांनी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील मेरिएट हॉटेलपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी पथ, विद्युत, प्रकल्प, अतिक्रमण, घनकचरा, पीएमआरडीए आणि क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते. १० किलोमीटरच्या अंतरावर प्रमुख चौकांची पाहणी आयुक्तांनी केली. महापालिका आयुक्तांनी व्हीआयपी रस्त्याच्या या दुरवस्थेवर अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करत त्वरित दुरुस्ती व सुशोभीकरणाचे आदेश दिले आहेत.
‘जी २०’ या परिषदेचे २०२३ मध्ये अध्यक्षपद भारताकडे आहे. देशातील सुमारे ५६ शहरांमध्ये वर्षभरात बैठका होणार आहेत. त्यापैकी तीन बैठका १३ ते १५ जानेवारी, १६ ते १८ जून व २८ व २९ जून या कालावधीत होणार आहेत. त्यादृष्टीने महापालिकेच्या तयारीला वेग आलेला आहे. राज्य व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला जात आहे.
विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याची पाहणी केली आहे. अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, रस्त्यात आलेल्या केबल काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते दुरुस्ती, सुशोभीकरणाची कामे २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जी २० परिषदेसाठी पुणे शहर लवकरच सज्ज होईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका