PMC Pune Tendernama
पुणे

Pune : कचरा प्रकल्पांंमधील वाहनांबाबत ठेकेदारांनी महापालिकेकडे केली 'ही' मागणी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कचरा प्रकल्पांमध्ये तयार झालेल्या उपपदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना भूस्थिर उपग्रह प्रणाली (जीपीएस ट्रॅकर) लावण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी ठेकेदारांनी पुणे महापालिका प्रशासनाकडे केली होती. पण, प्रकल्पात गाड्या कधी आल्या, केव्हा बाहेर पडल्या, कोणत्या ठिकाणी गाडी रिकामी केली, यावर प्रशासनाची नजर असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावला. तसेच, दिवाळीनंतरही कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहावेत, यासाठी ठेकेदारांना आदेश दिले आहेत.

दिवाळी सणानंतर शहरातील कचरा प्रश्न गंभीर होवू नये, यासाठी प्रशासनाने ठेकेदारांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यात मनुष्यबळ उपलब्ध नसणे आणि भूस्थिर उपग्रह प्रणाली लावलेली वाहने उपलब्ध होत नसल्याने त्यातून सूट मिळावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली होती. शहरात ओल्या-सुक्या कचऱ्याचे प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यात विविध प्रकारचे उपपदार्थ तयार केले जातात. त्याचा वापर पुढे बायोगॅस, बायोडिझेलसह खत तयार केले जाते. सिमेंट कंपन्यांना इंधन म्हणून प्लॅस्टिक आणि चिंध्या पुरविल्या जातात. हे उपपदार्थ वाहतुकीसाठी महापालिकेकडून प्रति टनासाठी ठेकेदाराला शुल्क दिले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक फेरीवर नियंत्रण असणे आवश्‍यक आहे. भूस्थिर उपग्रह प्रणाली नसेल तर संबंधित वाहन ठरलेल्या ठिकाणी गेले की नाही, त्यांच्या किती फेऱ्या झाल्या, यावर नियंत्रण ठेवणे शक्य असते.

या बैठकीत ठेकेदारांनी उपपदार्थ वाहतूक करण्यासाठी दरवेळी विविध गाड्या असतात. त्यामुळे प्रत्येक गाडीस भूस्थिर उपग्रह प्रणाली लावणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, असे सांगितले. त्यावर चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने प्रत्येक ठेकेदाराला भूस्थिर उपग्रह प्रणाली लावलेल्या गाड्या उपलब्ध करणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले. तसेच प्रत्येक प्रकल्पावर सीसीटीव्ही लावावेत, असेही ठेकेदारांना सांगितले.

ठेकेदारांना केलेल्या सूचना...

- दिवाळी संपल्यानंतर कचऱ्याचे प्रमाण वाढते त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जावेत

- किमान एक तृतीयांश कर्मचारी प्रकल्पावर उपस्थित असणे आवश्‍यक

- सकाळच्या सत्रात कचरा वाहतूक मजला रिकामा ठेवावा

- कचरा वाहतुकीच्या गाड्या थांबवून न ठेवता, त्वरित रिकाम्या कराव्यात

- यंत्रसामग्री खराब असल्यास रात्रीच्यावेळी त्यात दुरुस्ती करावी, त्यामुळे प्रकल्प दिवसा सुरू ठेवता येईल

- कचरा प्रकल्पातील कचऱ्याची दुर्गंधी पसरू देऊ नका, उप पदार्थांची त्वरित विल्हेवाट लावा

- दुपारच्या जेवणासाठी प्रकल्प बंद न ठेवता काही कर्मचारी जेवणासाठी नंतर पाठवावेत

दिवाळीनंतर कचऱ्याचे प्रमाण वाढते. त्यावर लवकर प्रक्रिया केली जावी, गाड्या लवकर रिकाम्या केल्या जाव्यात, मनुष्यबळाचा वापर व्यवस्थित करून प्रकल्पातील कामाची गती कमी होऊ नये, यासाठी ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. उपपदार्थ वाहतुकीसाठी गाड्यांना ‘जीपीएस’ असणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग