पुणे (Pune) : पादचारी, वाहनचालकांच्या सोईसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी भुयारी मार्ग बांधायचे, त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचे टेंडर काढायचे, पण पुणेकरांना चांगली सुविधा द्यायची नाही. भुयारी मार्गात मद्यपींच्या पार्ट्या, अस्वच्छता, पाणी तुंबून निर्माण झालेली दुर्गंधी यामुळे नागरिक भुयारी मार्ग वापरत नाहीत. त्यामुळे या मार्गांची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. नागरिकांना सुविधा मिळत नसल्या तरी भुयारी मार्गांचा पैसा मुरतोय कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा असली तरीही वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे अगदी काही सेकंदात रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत धरावा लागतो, अशी भीतीदायी परिस्थितीआहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांची तर तारांबळ उडते. पादचाऱ्यांना सहज रस्ता ओलांडता यावा, अपघात होऊ नये म्हणून महापालिका चार-पाच कोटी रुपये खर्च करून भुयारी मार्ग बांधते. त्याच पद्धतीने चौकामधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहनांसाठी भुयारी मार्गांची व्यवस्था आहे. महापालिका प्रशासन मोठा गाजावाजा करून कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी मार्ग बांधते, पण देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करते, असे ‘सकाळ’च्या बातमीदाराने केलेल्या पाहणीमध्ये समोर आले आहे. कोथरूड, कर्वेनगर, जंगली महाराज रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता, विश्रांतवाडी, हडपसर यासह अन्य भागातील भुयारी मार्गांची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. पाणी गळती होणे, कचरा न उचलणे, काही दिवे बंद असल्याने अपुरी प्रकाश व्यवस्था, दैनंदिन स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने कचऱ्याचा समस्या भेडसावत आहे.
हद्दीच्या वादात स्वच्छता नाही
भुयारी मार्गांची स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयांवर टाकलेली आहे. तसेच भुयारी मार्गातील खराब झालेले दिवे क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाने बदलणे आवश्यक आहे. तर स्थापत्य विषयक, रंगकाम सारखी कामे प्रकल्प विभागाकडून केली जातात. भुयारी मार्ग प्रकल्प विभागाने बांधल्याने त्यांनीच स्वच्छता करावी, अशी भूमिका क्षेत्रीय कार्यालयांकडून घेतली जाते. त्यामुळे या हद्दीच्या वादात झाडलोट, गाळ काढणे ही कामे होत नाहीत. प्रकल्प विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयांना केवळ पत्रव्यवहार केला जातो, पण प्रत्यक्षात काम होत नाही.
शहरात पादचारी व वाहनांसाठी १५ भुयारी मार्ग आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटीची तरतूद असून, त्यातून गळती बंद करण्यासाठी वॉटरप्रुफिंगची कामे करणे, रंग देणे, गंजलेल्या भागाची दुरुस्ती करणे अशी स्थापत्य विषयक कामे केली जातात. तर स्वच्छतेचे काम क्षेत्रीय कार्यालयाकडून केले जाते. जर काम केले नाही तर आम्ही ठेकेदाराकडून काम करून घेतो.
- अजय वायसे, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग