PMP Tendernama
पुणे

Pune : मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या पीएमपीच्या फीडर सेवेचा मार्ग 'खडतर'

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी पीएमपी प्रशासनाने ‘फिडर’ सेवेची सुरुवात केली. मात्र त्याला प्रवाशांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून १३ मार्गांवर ‘फिडर’ सेवा सुरू आहे. यातून महिन्याला ३२ बसच्या माध्यमातून सुमारे ५९ हजार ६०२ किलोमीटरचा प्रवास होतो. त्यातून उत्पन्न मात्र अवघे १७ लाख ९५ हजार २८४ रुपये मिळाले आहे. तर ५८ हजार १५३ प्रवाशांची वाहतूक झाली आहे. ‘फिडर’ सेवेतील बसच्या वाहतुकीचा खर्च प्रति किलोमीटर १०५ रुपये आहे, उत्पन्न मात्र प्रति किलोमीटर ३४ रुपये आहे. यावरून फिडर सेवेला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात येतो.

पीएमपीचा ‘प्रवास’ सध्या खडतर वाटेने सुरू आहे. आयुर्मान संपल्याने बसची संख्या कमी होत आहे. त्याचा परिणाम प्रवासी सेवेवर देखील होत आहे. प्रवाशांची संख्या घटत असल्याने पीएमपीच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत आहे. अशीच स्थिती ‘फिडर’ सेवेची देखील आहे. पीएमपीने १३ मार्गांवर ‘फिडर’ सेवा सुरू केली आहे. मात्र प्रवाशांनी त्या सेवेकडे पाठ फिरवली आहे. येत्या काही दिवसांत मेट्रोच्या नवीन स्थानकांवरून प्रवाशांची सेवा देखील सुरू होणार आहे. त्या स्थानकांना जोडण्यासाठी देखील पीएमपी ‘फिडर’ सेवा सुरू करणार आहे. उत्पन्न घटत असताना खर्च मात्र वाढत जाणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या तोट्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘फिडर’ सेवा दृष्टीक्षेपात

मार्ग : १३

बस फेऱ्या (दैनंदिन) : ३२

बस वाहतूक (दैनंदिन) : १२८ किलोमीटर

बस वाहतूक (महिना): ५९ हजार ६०२ किलोमीटर

प्रवासी उत्पन्न (महिना) : १७ लाख ९५ हजार २८४

प्रवासी संख्या (महिना) : ५८ हजार १५३

‘फिडर’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या काळात मेट्रोच्या नवीन स्थानकांना जोडण्यासाठी ‘फिडर’ सेवेचा विस्तार केला जाईल. त्यासाठी बसची संख्या वाढणे गरजेचे आहे. नवीन बस दाखल झाल्यावर ‘फिडर’ सेवेकरिता बसची संख्या वाढविणे शक्य होईल.

- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे