PMC Tendernama
पुणे

आयुक्त मुंबईला, अतिरिक्त आयुक्त दिल्लीला अन् पालिकेत शुकशुकाट!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेतील (PMC) वरिष्ठ अधिकारी बैठकांसाठी मुंबई (Mumbai), दिल्लीला (Delhi) गेलेले असताना अनेक विभागप्रमुख, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे सोमवार असूनही महापालिकेच्या तिन्ही मजल्यांवर तुरळक गर्दी होती.

महापालिकेत दर सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गऱ्हाणे मांडण्यासह इतर कामे करून घेण्यासाठी नागरिक येतात. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे माहिती अधिकार कायद्यांतर्गत सोमवारी फाइल बघायला मिळतात, त्यामुळे दुपारी ३ ते ५ या वेळेतही गर्दी असते. पण आज अनेक कर्मचारी जागेवर नसल्याने नागरिकांची कामे होऊ शकली नाहीत.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे जायका प्रकल्पाच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते, तर दुसरे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार स्वच्छ भारत अभियानाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. त्यामुळे दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर शुकशुकाट होता. महापालिकेत उपस्थित असलेले तिसरे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आज नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांची निवेदने स्वीकारली.

सकाळच्या सत्रात महापालिकेत अधिकारी उपस्थित होते. पण जेवणाची सुटी झाल्यानंतर अनेक अधिकारी पुन्हा फिरकलेच नाहीत. जे अधिकारी उपस्थित होते, ते महापालिकेतून लवकर बाहेर पडले. त्यानंतर कर्मचारी चहा पिण्याच्या बहाण्याने बाहेर होते.
दरम्यान, महापालिकेला शनिवारी व रविवारी सुटी असते. त्याचा परिणाम शुक्रवारीही कामकाजावर होतो. अनेक अधिकारी शुक्रवारी दुपारी साइट व्हिजिटच्या नावाखाली कार्यालयातून लवकर बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

इंटरनेट बंदचा असाही फायदा
महापालिकेतील इंटरनेट बंद पडल्याने कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना काम करता येत नव्हते. काम होत नसल्याने विभागप्रमुखही बाहेर पडले. तसेच महापालिकेत ऑनलाइन हजेरी घेतली जाते. इंटरनेट बंद पडल्याने कर्मचाऱ्यांना सकाळी व सायंकाळी हजेरी लावता आली नाही. त्याचाच गैरफायदा घेत अनेक जण लवकर निघून गेले.

कर्मचारी कार्यालयात आहेत की नाही हे विभागप्रमुखांनी तपासले पाहिजे. पण असे प्रकार रोखण्यासाठी कार्यालयात जाऊन अचानक तपासणी करू.
- सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग