पुणे (Pune) : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (COEP) चौकातील उड्डाणपुलामुळे (Flyover) महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषणाचा (Sound Pollution) त्रास होत होता. ही समस्या लक्षात आणून दिल्यानंतर अखेर महापालिकेच्या स्थायी समितीने उड्डाणपुलावर ध्वनीरोधक (साउंड बॅरिअर्स) लावण्यास मान्यता दिली आहे. या कामासाठी २ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
सीओईपी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने सुमारे दहा वर्षांपूर्वी या चौकात दुमजली उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी रस्ता रुंदीकरण उड्डाणपूल यासाठी रस्त्याची जागा कमी पडत असल्याने सीओईपीची जागा महापालिकेने भूसंपादन केली. या उड्डाणपुलामुळे महाविद्यालयाच्या वर्गखोल्या आणि रस्ता यातील अंतरही कमी झाले. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास वाढल्याने याचा परिणाम सीओईपीमधील शैक्षणिक वातावरणावर होत असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून उड्डाणपुलावर साउंड बॅरिअर्स लावावेत, अशी मागणी संस्थेकडून होत होती. त्यासाठी सल्लागार नेमून अभ्यास करण्यात आला असून, प्रकल्प विभागाने या कामासाठी टेंडर मागवले होते.
महापालिकेने यासाठी ३ कोटी ४८ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. या कामासाठी चार जणांनी टेंडर भरले, त्यापैकी सर्वात कमी रकमेची २ कोटी ८३ लाख रुपयांची टेंडर मे. द रेयकॉन कन्स्ट्रक्शन या कंपनीने भरली. हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला असता त्यास नुकतीच मान्यता देण्यात आली.
२० डेसिबलपर्यंत आवाज घटणार
साउंड बॅरिअर्स लावण्यासाठी केलेल्या अभ्यासात सीओईपीच्या परिसरात साधारणपणे ८५ ते ९० डिसेबल इतका आवाज आहे. मानांकनानुसार हा आवाज ७५ डेसिबलपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सल्लागाराने केलेल्या अभ्यासात साउंड बॅरिअर्स लावल्यानंतर २० डेसिबलपर्यंत आवाज कमी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सीओईपीमधील विद्यार्थी, प्राध्यापकांना वाहनांच्या आवाजाचा होणारा त्रास कमी होईल, असे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले.