Eknath Shinde Tendernama
पुणे

CM Eknath Shinde: एकदा शब्द दिल्यानंतर मी तो मागे घेत नाही; त्यामुळे...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : एकदा शब्द दिल्यानंतर मी तो मागे घेत नाही. त्यानुसार बांधकामावरील शास्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. तीस, चाळीस वर्षांपूर्वी गरजेपोटी झालेली बांधकामे नियमित करण्याचा निर्णयही लवकरच सरकार घेईल. कुणालाही बेघर करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना दिली.

शिवसेनेच्या (शिंदे गट) राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानांतर्गत किवळे येथील मुकाई चौकात झालेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेच्या प्रवक्त्या मीना कांबळी, शीतल म्हात्रे, उपनेते इरफान सय्यद, युवासेना पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजित बारणे, मावळ लोकसभा जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीरंग बारणे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, श्री क्षेत्र देहू, आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचाही संकल्प आम्ही केला आहे. नदी सुधार प्रकल्पांतगर्त ‘डीपीआर’ तयार करून केंद्राला प्रस्ताव पाठविला आहे. त्याचाही पाठपुरावा सुरू आहे. त्यालाही मान्यता मिळेल.

प्राधिकरणाने संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला सिडकोप्रमाणे सव्वा सहा टक्के व दोन टक्के एफएसआय देऊन भूखंड परताव्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मतदारसंघातील विविध प्रकल्पांबाबत आधीच्या सरकारकडे मागणी केली. मात्र ते मार्गी लागले नाहीत. शिंदे यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मात्र सकारात्मक बदल झाला. लोणावळ्यातील विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. पवना, इंद्रायणी नद्या स्वच्छतेचा संकल्पही सरकारने केल्याचा आनंद वाटतो. आता शहरातील बांधकामे अधिकृत व्हावीत, साडे बारा टक्के परताव्याचा प्रश्नही सुटावा.

- श्रीरंग बारणे, खासदार