Pune Tendernama
पुणे

तळेगाव-चाकण रस्ता दुरुस्तीच्या भूमिपुजनाला वर्ष उलटले तरीही...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : तळेगाव-चाकण (Talegaon-Chakan) राज्य मार्गाच्या विशेष दुरुस्तीतंर्गत सहा किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम पुणे उत्तर विभागामार्फत सुरु आहे. मात्र, चार कोटी ८६ लाख रुपये अंदाजपत्रकीय टेंडर रकमेच्या या कामाला वेळेवर निधी उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी भूमिपूजनानंतर एक वर्ष उलटले, तरी हे काम अद्याप अपूर्ण आहे. याबद्दल वाहनचालक, नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या विधिमंडळातील पुरवणी मागणी अंतर्गत निधीतून होणाऱ्या या कामाचे गेल्यावर्षी ८ एप्रिलला भूमिपूजन झाले होते. याप्रसंगी हे काम दीड, दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे आश्वासन शेळके यांनी दिले होते. भूमिपूजनानंतर आठवडाभरात या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. त्यानंतर ते महिनाभरात बंद पडले. दरम्यान, अठरा मीटर रुंदीकरणासाठी अगदी रस्त्यालगत खोदलेल्या चरांमुळे अपघात वाढले. एका जीवघेण्या अपघाताप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ठेकेदारास गेल्या सप्टेंबर महिन्यात अटकही झाली होती. त्यानंतर तरी हे काम वेग घेईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती मात्र ती फोल ठरली आहे.

नागरिकांनी या विरोधात आवाज उठविल्यावर गेल्या दोन-तीन आठवड्यांपूर्वी मनोहरनगर ते गुलाबी शाळेपर्यंत एका बाजूचे काही अंशी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, निविदेतील अटी शर्तीनुसार भूमिपूजनानंतर वर्ष उलटूनही वडगाव फाटा ते माळवाडी टप्प्यातील काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. प्रस्तावित पाच मोऱ्या, एक पूल, दुभाजकाचे काम कुठेही झालेले दिसत नाही. सुरक्षा चिन्हे, सूचना फलक, रिफ्लेक्टरही लावण्यात आले नाहीत. नियोजित सहा किलोमीटरपैकी जेमतेम अडीच ते तीन किलोमीटर पटट्यात काही अंशी काम वर्षभरात झाले आहे. अर्धवट अवस्थेत सोडलेल्या खोदकामामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे असून वर्षभरात अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठेकेदाराला देयके अदा न झाल्याने काम थांबले होते. कार्यकारी अभियंत्यांनी नुकताच आणखी काही निधी उपलब्ध करून दिला आहे. महिनाभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

- वैशाली भुजबळ, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

कोरोनामुळे निधी उपलब्ध होण्यात अडचणी आल्याने हे काम रखडले होते. आवश्यक तेथे दुभाजक टाकून येत्या महिनाभरात किमान इंदोरीपर्यत हे काम पूर्ण करण्याबाबत बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत.

- सुनील शेळके, आमदार, मावळ