पिंपरी (Pimpri) : चाकणमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी MIDC) कंपन्यांच्या व्यवस्थापनास स्थानिक गुंड, कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण त्रास देत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून चाकण एमआयडीसी परीसरातील वाहतूक समन्वय बैठक तसेच पोलिस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन यांची बैठक मंगळवारी वासुली येथील टेट्रा पॅक कंपनीत पार पडली. त्यावेळी ‘एमआयडीसी’तील कारखाने टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तेथे भयमुक्त वातावरण ठेवण्याचा उद्देश आहे, असेही चौबे यांनी आवर्जून नमूद केले.
या बैठकीला पोलिस उपायुक्त बापू बांगर, डॉ. शिवाजी पवार यांच्यासह वाहतूक विभाग, एमआयडीसी, ‘एनएचएआय’, प्रादेशिक परिवहन, माथाडी बोर्ड, महसुल, पीएमआरडीए अशा विविध विभाग व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे १०० ते १२५ कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले.
चौबे यांनी सांगितले की, कंपन्यांच्या आतील भागाप्रमाणेच बाहेरील जागा, सार्वजनिक रस्त्यावर उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. कामगारांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या कंपनीच्या बाहेरील रस्त्यावर पार्किंग केल्या जाऊ नयेत. त्यांच्यासाठी प्रवेशद्वाराच्या आत पार्किंगची सोय करावी. तसे शक्य नसल्यास पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच सुरक्षा रक्षक नेमावेत.
या बैठकीत प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली. म्हाळुंगे भागातील औद्योगिक परिसरासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याची वेगळी निर्मिती झाली आहे. या ठाण्यास दोन निरीक्षक, सहा अधिकारी व १०७ अंमलदार नेमण्यात आले आहेत. नागरीकांनी ११२ हा क्रमांक डायल केल्यानंतर अंदाजे पाच ते सहा मिनिटांत पोलिसांची मदत उपलब्ध होते.
औद्योगिक तक्रारीचे तत्काळ निवारण व्हावे म्हणून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या खंडणी विरोधी पथकात औद्योगिक तक्रार निवारण कक्ष स्थापन झाला आहे. त्याद्वारे औद्योगिक परीसरातील समस्यांची त्वरित सोडवणूक केली जाते.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत एकूण सहा गुन्ह्यांमध्ये मोक्का कायद्यानुसार ३९ गुंडांवर कारवाई झाली आहे. ‘एमपीडीए’ अंतर्गत पाच गुंडांवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई सुरु केली आहे. २६ गुंडांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
उद्योजकांनी दादागिरीसह कोणतीही समस्या निर्माण झाल्यास तसेच तसेच माथाडी कामगारांबाबत काहीही तक्रार असल्यास समक्ष पोलिस ठाण्याला तक्रार द्यावी. याशिवाय पोलिस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथकांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या औद्योगिक तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केल्यास तत्काळ मदत मिळेल.
- विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त