पुणे (Mumbai) : रोख व्यवहारांकडून डिजिटल व्यवहारांकडे संपूर्ण जग वळताना दिसते आहे. भारतही त्याला अपवाद नसून, 2023 मध्ये देशातील रोखीच्या व्यवहारांपेक्षा डिजिटल माध्यमातून केलेल्या व्यवहारांची संख्या अधिक असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ग्लोबल पेमेंट्स रिपोर्ट (GPR) - 2022च्या आकडेवारीनुसार भारतातील ई-कॉमर्स मार्केटमध्ये पुढील तीन वर्षांत 96 टक्क्यांनी वाढून 120 अब्ज डॉलर वर पोहचणार आहे. ई-कॉमर्स पेमेंट्ससाठी डिजिटल वॉलेट्स, बीएनपीएल पद्धतींचा वापर वाढेल, असा अंदाज आहे. वर्ल्डप्ले फ्रॉम एफआयएस या संस्थेकडून ग्लोबल पेमेंट्सच्या चालू आणि भविष्यातील ट्रेंड्स बद्दल अहवाल प्रसिद्ध केला जातो.
भारतात तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनमध्ये प्रगती झाल्यापासून कॅशलेस पेमेंट्सचा वापर करण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. २०२१ मध्ये सर्वाधिक पसंतीच्या व्यवहार पद्धती असलेल्या प्रीपेड कार्ड्स, कॅश ऑन डिलीव्हरी, रोख पैसे , क्रेडिट, डेबिट कार्डच्या वापराचे प्रमाण आता कमी होत चालले आहे. या अहवालानुसार भारतात २०२५ पर्यंत डिजिटल वॉलेट्स पद्धती ई- कॉमर्स पेमेंट पद्धतींवर वर्चस्व गाजवतील आणि त्यांचा एकूण व्यवहार मूल्यातील वाटा ५२.९ टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२५ पर्यंत ई-कॉमर्सच्या व्यवहारातील त्याचा एकूण वाटा फक्त ८.८ टक्के असेल. तर डिजिटल वॉलेट्सचा वाटा ४५.४ टक्के असेल. त्यानंतर डेबिट कार्ड्सचा वाटा १४.६ टक्के आणि क्रेडिट कार्ड्सचा वाटा १३.३ टक्के असेल.
त्याशिवाय, बाय नाऊ पे लेटर अर्थात BNPL ही भारतातील वेगाने विकसित होत असलेली ऑनलाइन पेमेंट पद्धत आहे. बीएनपीएल सेवा ग्राहकांना वन- टाइम इनव्हॉइस किंवा निश्चित सुलभ हप्त्यांमध्ये सेवा किंवा उत्पादनांचे पैसे भरण्याची भुमा देते. ही पद्धत ई- कॉमर्स बाजारपेठेच्या मूल्याच्या २०२१ मधील ३ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ८.६ टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे.
भारताची पॉइंट-ऑफ-सेल बाजारपेठ २०२१ ते २०२५ दरम्यान २८.८ टक्क्यांनी वाढणे अपेक्षित असून तेव्हा ती १.०८ ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करेल. २०२१ मध्ये इन- स्टोअर पेमेंट्साठी रोख पैशांना प्राधान्य दिले जात होते. त्यानंतर डिजिटल वॉलेट्सचे प्रमाण २४.८ टक्के आणि क्रेडिट कार्ड्सचे प्रमाण १८.१ टक्के होते. मात्र, २०२३ पर्यंत डिजिटल वॉलेट्स रोख पैशांना मागे टाकतील व व्यवहारातील त्यांचा वाटा ३०.८ टक्के असेल असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.