Eknath Shinde, Chandni Chowk Tendernama
पुणे

चांदणी चौकातील पूल पडला; आता पुढे काय? कोंडी फूटली का...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यातल्या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातला पूल अखेर शनिवारी मध्यरात्री 1 वाजून 7 मिनिटांनी कंट्रोल्ड ब्लास्ट करत पाडण्यात आला. स्फोटानंतर पुलाजवळ काही वेळ केवळ धुळीचे लोटच दिसत होते. हळूहळू धुळीचे लोट खाली बसले आणि चांदणी चौकातला पूल पडल्याचे चित्र समोर आले. गेले अनेक दिवस पूल पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. याकामासाठी 600 किलो स्फोटके वापरण्यात आली. पूल पडल्यानंतर रस्त्यावरील राडारोडा वेगाने हटवून रस्ता वाहतुकीसाठी शक्य तितक्या लवकर खुला करण्याचे प्रशासनासमोर आव्हान होते. प्रशासनाने ते पेलले असले तरी येथून पुढे खरी परिक्षा असणार आहे.

वाहतूक कोंडीने हैरान झालेल्या नागरिकांना चांदणी चौकातून सुरळीत प्रवास करण्याची इच्छा आहे. पूल पडला, आता सारे काही सुरळीत होणार, अशी आशा लागून राहिलेल्या पुणेकरांना मात्र चांदणी चौकातून वाहतूक कोंडीविना प्रवास करण्यासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा प्रचंड मोठा प्रकल्प असून, त्याचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिने वाट पाहावी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे चांदणी चौकातील कोंडी फोडतानाच प्रशासनाला घाम फूटला असला तरी चांदणी चौकाच्या मागे पुढे असलेल्या भागातही वाहतूक सुरळीत झाली तर या सर्व उठाठेवेचा फायदा होईल. अन्यथा पुन्हा चांदणी चौकातून वेगाने आलेली गाडी पुढे कोंडीत अडकली तर त्यामुळे समस्या कारण राहणार आहे.

त्यासाठी प्रशासनाने पुणे शहरातून जाणाऱ्या मुंबई - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याती आवश्यकता आहे. कारण वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविताना फक्त चांदणी चौकातील विचार करून चालणार नाही, तर संपूर्ण मार्गावरील वाहतूक कोंडीचा अभ्यास करून त्यावर दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तरच या मार्गावरून प्रवास करणे आनंददायी होऊ शकेल.