पुणे (Pune) : ''मुळामुठा नदी काठ सुधार प्रकल्पाच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बाजूला ठेवले. राज्यसभा खासदार शरद पवार यांना बैठक घेण्याचे काय अधिकार? पालकमंत्र्यांना न बोलविता दुसरे सुपर पॉवर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, हा नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न आहे,'' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कुदळ मारलेल्या पुण्यातील (Pune) नदीकाठ सुधार योजनेवर काम सुरू होण्यापूर्वीच ठाकरे सरकारकडून हातोडा मारला जाण्याची शक्यता आहे. या योजनेची वर्क ऑर्डर थांबवून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दणका देण्याची तयारी ठाकरे सरकार करत आहे. या योजनेवरील पर्यावरणप्रेमींचे आक्षेप ऐकून घेतल्यानंतर समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे साडेआठशे कोटी रुपयांचे टेंडरचे काम खोळंबले आहे.
भाजप नगरसेवकांनी केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कोथरूड, वानवडी, वडगाव शेरी, बोपोडी यासह इतर एकूण २० कार्यक्रम झाले. वानवडी येथे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत झालेल्या बैठकीबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, मुंबईत झालेली बैठक बेकायदेशीर आहे. एका राज्यसभा सदस्यांना अशी बैठक बोलविता येत नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना न बोलविता बैठक झाली आहे. सगळ्या परवानग्या झाल्यानंतर हा प्रकल्प अंतिम झाला. अजित पवारांना बाजूला सारून सुपर पॉवर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे एक नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. शरद पवार यांनी खासदार वंदना चव्हाण यांना सोबत घेऊन बैठक केली. या प्रकल्पाचे टेंडर थांबविणे इतके सोपे नाही, महापालिकाही याविरोधात न्यायालयात जाईल.
माहिती मिळवणे हा विरोधीपक्ष नेत्याचा अधिकार असतो, जेव्हा सत्ताधारी माजतो, तेव्हा त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम विरोधकांचे असते. देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे पण फडणवीस पोहोचलेले खेळाडू आहेत. हा पेनड्राइन बॉम्ब हे हिमनगाचे टोक आहे. अजून नऊ दिवस सत्ताधाऱ्यांनी जपून राहावे. दुसरा बॉम्ब कोणावर फोडणार हे देवेंद्र फडणवीस यांनाच ही माहिती आहे. आम्ही नको त्या विषयात नाक खुपसत नाही. सोमवारी व मंगळवारी बॉम्ब टाकू असे फडणवीस यांनी मला सांगितले आहेत, त्यामुळे तुमच्या सोबतही मलाच ही माहिती मिळणार आहे.