पुणे (Pune) : कोरेगाव पार्कच्या नॉर्थमेन रस्त्यावर रागविलास सोसायटीसमोर बस थांब्याजवळ गेल्या महिन्यापासून रस्ता खचून मोठा खड्डा पडल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप हा खड्डा बुजविण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून महापालिकेने त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी करत आहेत.
कोरेगाव पार्कमध्ये नॉर्थ मेन रोडवर रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. जवळच कस्तुरबा गांधी शाळा आहे. शेजारीच बस स्टॉप आहे. हा रस्ता रहदारीचा रस्ता आहे. खचलेल्या भगदाडावरून वाहन गेल्यास मोठा खड्डा होऊन, त्यात अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते. रस्ता खचून भगदाड पडल्याने रस्ते बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. रस्ता खचल्याने कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होते. महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालावे.
- अभिजित वाघचौरे, सदस्य, कोरेगाव पार्क रहिवासी संघ
नुकतेच पुण्यात समाधान चौकात महापालिकेचे मोठे वाहन, रस्ता खचून त्यात अडकले होते. तशी घटना कोरेगाव पार्कमध्ये घडण्याआधी महापालिकेने यात लक्ष घालावे.
- प्रकाश बर्गे, स्थानिक नागरिक
याबाबत मुख्य खात्याला कळवून दुरुस्ती करून घेण्यास सांगतो.
- बाळासाहेब पंडित, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय