mahabhumi Tendernama
पुणे

भूमी अभिलेखने सुरु केलेल्या प्रॉपर्टी कार्डचे असे होणारे फायदे

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शहरातील सातबारा उतारा पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड यांच्या पडताळणीचे काम भूमी अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या मिळकतींचे भूमी अभिलेख सुरू आहेत, अथवा सातबारा उतारा आहे. परंतु, प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले नाही किंवा दोन्ही आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावरील नोंद प्रॉपर्टी कार्डवर घेतलेली नाही, अशा मिळकतींचा शोध घेऊन त्यांचे फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या गोष्टींचा फायदा घेऊन नागरिक आणि बँकाची होणारी फसवणूक टळण्यास मदत होणार आहे.

राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम झाले आहे, अशा शहरात मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्ही सुरू आहेत. अथवा, सिटी सर्व्हे झाले असून देखील सातबारा उतारा सुरू आहे. अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमि अभिलेख विभागाने यापूर्वी घेतला आहे. त्यासाठी भूमि अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे.

महापालिकेच्या हद्दीत यापूर्वी भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. मात्र त्या जागेचे सातबारा उतारे बंद करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जागांच्या खरेदी-विक्रीवेळी सोईनुसार सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. त्यामुळे भूमि अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुणे शहरातील सातबारा उतारा बंद करण्यात आले. परंतु, काही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले नाही. त्यामुळे अशा मिळकतदारांना व्यवहार करताना अडचणी येत आहे. तर काही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले असून देखील सातबारा उतारा देखील सुरू राहिला आहे. तर काही प्रकरणांमध्ये सातबारा उताऱ्यावर नावे प्रॉपर्टी कार्ड घेण्यात आलेली नसल्याचेही समोर आले आहे.

सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड यांची एकत्रित पडताळणी करण्याचे काम भूमि अभिलेख विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये शहरात बिनशेती झालेल्या सर्व जमिनींचे सातबारा उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्डच यापुढे ठेवण्यात येणार आहे, असे भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, जेथे शेत जमीन आहे, तेथे मात्र सातबारा उताराच सध्या तरी सुरू ठेवण्यात येणार आहे.

प्रॉपर्टी कार्डचे नागरीकांना होणारे फायदे

-सातबारा उतारा हद्दपार होऊन मिळणार प्रॉपर्टी कार्ड

-प्रत्येक मिळकतीची हद्द होणार निश्‍चित

-मिळकतीच्या बेकायदा खरेदी- विक्रीला बसणार आळा

-मिळकतदारांना सुलभरीत्या मिळणार कर्ज

-अतिक्रमणे काढणे होणार शक्‍य

-घरबसल्या प्रॉपर्टी कार्ड मिळणार