पुणे (Pune) : पुणे जिल्ह्यातील दौंड, पुरंदर, इंदापूर, हवेली, मुळशी आणि बारामतीमधील १९ हजार ३०९ नागरिकांना स्वामित्व योजनेंतर्गत मालमत्तेचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड पहिल्यांदाच देण्यात आले. त्यापोटी सनद फी मधून भूमी अभिलेख विभागाला १ कोटी २८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
गावाची वाढती लोकसंख्या, विकासाच्या निरनिराळ्या योजनांमुळे गावात भौगोलिक बदल होत असून जमीन हस्तांतर प्रक्रिया वेगाने होत आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील बांधकाम परवाने देण्याचे अधिकार योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी जागेचा नकाशा व गावठाणाचे भूमापन असणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात गावठाणाचे अभिलेख नसल्यामुळे नेमकी जागा किती आहे, याबाबत सुस्पष्टता नसते. तसेच मालमत्तेचे मालकीपत्र नसल्यामुळे आर्थिक पतही निर्माण होत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करून जमीन मोजणीचे काम स्वामित्व योजनेच्या माध्यमातून हाती घेतले आहे. या योजनेतून आतापर्यंत जवळपास वीस हजार नागरीकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून दिले असल्याची माहिती भूमी अभिलेख पुणे प्रदेशचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी दिली.
ग्रामपंचायतींना स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना हाती घेतली आहे. ग्रामपंचायतींना मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असला तरी वाढत्या नागरीकरणाच्या प्रमाणात कराच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसून येत नाही. त्यामागे संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व मिळकती किंवा मालमत्ता या कराच्या जाळ्यात आलेल्या नसणे अथवा त्यांची आकारणी झालेली नसणे ही प्रमुख कारणे आहेत. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावठाणामधील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड दिल्यास त्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्याचबरोबरच प्रॉपर्टी कार्डमुळे घरांचा मालकीहक्क प्रस्थापित होणार आहे. या घरांवर कर्ज, तारण करणे शक्य होणार आहे. गावठाणातील हद्दीचे वाद संपुष्टात येणार असून गावचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार आहे. याचसह ग्रामपंचायतींना नव्याने कर आकारणी करणे सुलभ होणार आहे, असेही ते म्हणाले.
तालुका - प्रॉपर्टी कार्डची संख्या
दौंड - २२२७
पुरंदर - ५३९३
इंदापूर -२४३१
हवेली -१७२७
मुळशी -५०३१
बारामती-२५००