Balgandharva Rang Mandir Tendernama
पुणे

पुणेकरांना 'बालगंधर्व' हवे की अत्याधुनिक नाट्यगृह? निर्णय झाला...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणेकरांचे भावनिक जडलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या (Balgandharav Rangamandir) पुनर्विकासाचा आराखडा तयार केला असला तरी त्यात बदल करण्यात येणार आहेत. मुख्य नाट्यगृहाची क्षमता ८०० इतकीच दाखविण्यात आली असून, ती अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाट्यगृह किमान १ हजार क्षमतेचे असले पाहिजे, त्याचे सुशोभीकरण आणखी देखणे होणे आवश्‍यक आहे, अशा सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या. त्यामुळे सध्या मंजूर केलेला आराखडा अंतिम नसून, त्यात बदल होणार आहेत. दरम्यान, जुने नाट्यगृह पाडून तेथे नवे संकुल उभारण्यासाठी किमान १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

‘बालगंधर्व’ला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेकवेळा दुरुस्ती करूनही कलाकारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी आर्किटेक्ट निवडीसाठी महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली होती. महापालिकेने जाहिरात देऊन यासाठी अर्ज मागविले होते. त्यात ५७ जणांचे अर्ज आले. तर त्यापैकी २६ जणांनी पुनर्विकासाचे ड्रॉइंग सादर केले.

५ मार्च २०१९ आणि ६ मार्च २०१९ या दोन दिवसांत उपसमितीपुढे २४ आर्किटेक्टने त्यांचे सादरीकरण केले. त्यामध्ये ८ जणांची निवड करून हा त्याचे प्रस्ताव महापौरांच्या अध्यक्षतेखालील मुख्य निवड समितीसमोर ठेवण्यात आले. २९ मे २०१९ रोजी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय येथे झालेल्या बैठकीत ८ आर्किटेक्टचे सादरीकरण झाले. त्यानंतर १४ ऑगस्ट २०१९, ३ डिसेंबर २०२०, ५ जानेवारी २०२१, १५ जानेवारी २०२१ आणि १ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकांमध्ये चर्चा करून आठ पैकी एक आर्किटेक्टची निवड करण्यात आली. त्यानंतर कोरोनामुळे गेली दोन वर्षे यासंदर्भातील प्रक्रिया ठप्प झाली. अखेर ६ मे २०२२ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर सादरीकरण झाले.

पुनर्विकासामध्ये ८०० क्षमतेचे एक मोठे नाट्यगृह, ५०० आणि ३०० क्षमतेची दोन नाट्यगृहे बांधली जाणार आहेत. तसेच नदीच्या बाजूने खुले सभागृह असेल. यामध्ये १० हजार आणि ५ हजार चौरस फुटांच्या दोन कालदालनांचा समावेश आहे. तर २५० कार आणि ८०० दुचाकी क्षमतेचे वाहनतळ असणार आहे. पवार यांच्यासमोर हे सादरीकरण झाले असता त्यांनी त्यामध्ये बदल करण्यच्या सूचना महापालिकेला दिल्या. नाट्यगृहाची ८०० ही क्षमती कमी असून, ते किमान १ पेक्षा जास्त क्षमतेचे असले पाहिजे. नवे बालगंधर्व अधिक सुंदर, आकर्षक असले पाहिजे, नाट्यगृहाचे प्रवेशद्वार भव्य असावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

‘बीकेसी’तील नाट्यगृह पहा
नव्या नाट्यगृह बांधण्यापूर्वी मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नाट्यगृह पहा, तेथील अंतर्गत सजावट कशी आहे ते पाहून त्याप्रमाणे बालगंधर्वमध्ये तसा बदल करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत त्यांनी बालगंधर्वच्या पुर्नविकासाच्या आराखड्यात बदल सुचविले आहेत. नाट्यगृहाची क्षमता जास्त असली पाहिजे तसेच सुशोभीकरणासाठी मुंबईतील मॉल बघा अशी सूचना केली आहे. तेथे पाहणी केल्यानंतर सुधारित आराखडा तयार केला जाईल. नाट्यगृहाच्या बांधकामासाठी ७० कोटी तर अंतर्गत सुशोभीकरणासाठी ३० कोटी असा १०० कोटीपर्यंत खर्च येईल. या किमान ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो.
- विक्रमकुमार, आयुक्त, महापालिका