Deemed Conveyance Tendernama
पुणे

पुणे, पिंपरीमधील 600 सोसायट्यांना मिळेना हक्काच्या जागेची मालकी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे नऊ हजार ६०० गृहनिर्माण संस्थांची (हौसिंग सोसायट्या) शीर्षक हस्तांतरणाची प्रक्रिया (कन्व्हेयन्स डीड) अद्याप पूर्ण झालेली नाही. या सोसायट्यांच्या जागेचा सातबारा अद्यापही विकसकाच्याच नावावर कायम आहे. त्यामुळे हक्काच्या घरासाठी कर्ज काढलेल्या पुणेकरांच्या जागेचा मालक मात्र विकसकच आहे.

गृहनिर्माण संस्था कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित विकसकांनी सहकारी सोसायट्या स्थापन करून त्या सदनिकाधारकांच्या ताब्यात दिल्या. पण सोसायट्यांच्या जागेच्या मालकीचा सातबारा उतारा मात्र स्वतःकडेच कायम ठेवला आहे. विकसकाने गृहनिर्माण सोसायट्यांना कन्व्हेयन्स डीड करून देणे अनिवार्य आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार कन्व्हेयन्स डीड होत नाही तोपर्यंत जागेचा कायदेशीर मालक विकसकच राहतो. सातबारा उतारा आणि महापालिकेच्या प्रॉपर्टी कार्डवरही विकसकच मालक राहतो. बुहतांश विकसकांना नेमके हेच हवे असते. कारण केवळ बांधून दिलेल्या सदनिकांच्या बदल्यात संबंधित विकसकाला आधीच मोठा मोबदला मिळालेला असतो आणि जागेच मालक राहत असल्याने तो भविष्यातही सोसायटीच्या आवारात सोईनुसार अदलाबदल करू शकतो. यात हा धोका असल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संजय राऊत यांनी सांगितले. जागेचा कायदेशीर कायदेशीर मालकी हक्क मिळण्यासाठी सोसायट्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कन्व्हेयन्स डीड करून घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

... अन्यथा डीम्ड कन्व्हेयन्स करा

विकसक कन्व्हेयन्स डीड करून देत नसेल तर कोणतीही सोसायटी स्वतःहून पुढाकार घेऊन डीम्ड कन्व्हेयन्स (मानीव अभिहस्तांतरण) करून घेऊ शकते. ते केल्यानंतर सोसायटीला जागेचा कायदेशीर मालकी हक्क मिळतो. डीम्ड कन्व्हेयन्स म्हणजे विकसकाच्या संमतीशिवाय जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार सोसायटीला मिळणारा जागेचा कायदेशीर मालकी हक्क होय.

कन्व्हेयन्स डीड नसल्याचे तोटे

- सोसायटीची जागा विकसकाच्या मालकीची राहते

- विकसक सोईनुसार आणि सोसायटीच्या संमतीशिवाय फेरबदल करू शकतो

- सोसायटी इमारत पुनर्विकासात बऱ्याच अडचणी येतात.

- सोसायटी पुनर्विकासासाठी बँकेकडून कर्ज घेता येत नाही

- दुर्घटनेत इमारत उद्ध्वस्त झाल्यास सदनिका पुन्हा मिळत नाही

कन्व्हेयन्स डीडचे फायदे

- सोसायटीला जागेचा कायदेशीर मालकीहक्क मिळतो

- महापालिकेचे प्रॉपर्टी कार्ड सोसायटीच्या नावाने घेता येते

- सोसायटी इमारत पुनर्विकासातील अडथळे दूर होतात

- सोसायटी इमारत पुनर्विकासासाठी बँकांकडून कर्ज मिळू शकते

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थिती

- एकूण हौसिंग सोसायट्या ः २० हजार ९५०

- अपार्टमेंट्सची संख्या ः १५ हजार

- विकसकाने कन्व्हेयन्स डीड केलेल्या सोसायट्या ः ३ हजार हजार ७००

- ‘म्हाडा’च्या हौसिंग सोसायट्या ः ७५०

- मानीव हस्तांतरण करून घेतलेल्या सोसायट्या ः ७ हजार

- अद्याप कन्व्हेयन्स डीड न झालेल्या सोसायट्या ः ९ हजार ६००

पुणे व पिंपरी-चिंचवड मिळून आजघडीला एकूण सोसायट्यांपैकी केवळ तीन हजार सोसायट्यांना विकसकाने कन्व्हेयन्स डीड करून दिले आहे. अन्य सुमारे सात हजार सोसायट्यांनी स्वतः पुढाकार घेत डीम्ड कन्व्हेयन्स करून घेतले आहे. सुमारे सातशे सोसायट्या म्हाडाच्या आहेत. त्यांची जागा सरकारी असल्याने कन्व्हेयन्स डीड किंवा डीम्ड कन्व्हेयन्स करण्याची त्यांना गरज नाही. उर्वरित सुमारे नऊ हजारांपेक्षा जास्त सोसायट्यांनी मात्र त्वरित डीम्ड कन्व्हेयन्स करून घ्यावे, अन्यथा या सोसायट्यांना त्यांच्या जागेचा कायदेशीर मालकी हक्क गमवावा लागेल.

- संजय राऊत, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गृहनिर्माण सोसायटी विभाग