Pune City Tendernama
पुणे

Pune : गणेशोत्सवातील कोंडी मेट्रोच्या पथ्यावर; दहा दिवसांत 'एवढे' उत्पन्न

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गणेशोत्सवाच्या काळात चौकाचौकात होणारी वाहतूक कोंडी, लांबणारा अन् कंटाळवाणा प्रवास टाळत मेट्रोने प्रवास करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले. यंदाच्या गणेशोत्सवात सुमारे १० लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला, यातून एक कोटी ४० लाख ७१ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. गणेश विसर्जनाच्या दिवशी दोन्ही मार्ग मिळून एक लाख ६३ हजार २२७ प्रवाशांनी प्रवास केला. हा आकडा मागच्या दहा दिवसातला सर्वाधिक होता. मात्र, तो मेट्रोच्या प्रवासी संख्येचा उच्चांक ठरला नाही. १५ ऑगस्ट रोजी सर्वाधिक म्हणजे एक लाख ६९ हजार ५१२ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे.

मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवरून रोज सुमारे ४० ते ४५ हजार प्रवासी प्रवास करतात. गणेशोत्सवाच्या काळात मात्र यात दररोज भर पडत गेली. १८ सप्टेंबरला ४६ हजार १०१ प्रवाशांनी प्रवास केला यातून पहिल्या दिवशी सात लाख ४८ हजार ६६८ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तर शेवटच्या दिवशी एक लाख ६३ हजार ८६१ प्रवाशांनी प्रवास केला. यातून २५ लाख ५८ हजार ६९१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.

वनाज ते रूबी हॉल सर्वाधिक प्रवासी

मेट्रोच्या दोन्ही मार्गांपैकी प्रवाशांची सर्वाधिक संख्या ही वनाज ते रूबी हॉल क्लिनिक मार्गावर होती. गणेश विसर्जनाच्या दिवशी या मार्गावर एक लाख ११ हजार ९८० प्रवाशांनी प्रवास केला तर पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गावर ५१ हजार ८८१ प्रवाशांनी प्रवास केला. पिंपरीच्या तुलनेत वनाजवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुपटीने जास्त होती. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात पिंपरी चिंचवड मार्गावरून चार लाख पाच हजार २८० प्रवाशांनी प्रवास केला. तर वनाजच्या मार्गावरून पाच लाख ५६ हजार ८२ प्रवाशांनी प्रवास केला.

मेट्रो स्थानक गर्दीने फुलले

गुरुवारी सकाळपासून मेट्रो स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. ती रात्री दोन वाजेपर्यंत तशीच होती. पुणे महापालिका स्थानकावरून २२ हजार १, डेक्कन जिमखाना २१ हजार ५७१ प्रवाशांनी प्रवास केला. मंगळवार पेठ स्थानकावरून सर्वांत कमी ६८७ प्रवाशांनी प्रवास केला.

गणेश विसर्जन व गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य दिले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.

- हेमंत सोनवणे, महा व्यवस्थापक (जनसंपर्क), मेट्रो