पुणे (Pune) : शहरांमध्ये एसटी बसला (ST Bus) प्रवासी मिळेना अन् ग्रामीण भागात एसटी मिळेना, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. याचा फटका प्रवासी आणि एसटी प्रशासनालाही बसतो आहे.
राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र, अजूनही प्रवासी संख्येत दररोज सुमारे २५ लाख प्रवाशांची घट आहे. शहरी भागात धावणाऱ्या एसटी गाड्यांची स्थिती खराब आहे. त्यामुळे शहरी भागातील प्रवाशांनी एसटीला रामराम ठोकला आहे; तर गाड्यांची संख्या कमी असल्याने एसटी प्रशासनाने ग्रामीण भागातील बहुतांश मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती व बस गाड्यांची स्थिती खराब आहे. एकूण १८ हजार गाड्यांपैकी सध्या केवळ सुमारे १२ हजार बस धावत आहेत. सुमारे पाच हजार एसटी गाड्यांचे आयुर्मान संपल्याने त्यांना प्रवासी सेवेतून बाहेर काढले आहे. तर एक हजार गाड्या देखभाल-दुरुस्ती, आरटीओ, पोलिस व अन्य तांत्रिक कामांमुळे रस्त्यावर धावत नाही.
म्हणजे सुमारे सहा हजार गाड्या प्रवासी सेवेत नाहीत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ग्रामीण भागात कमी उत्पन्नाच्या मार्गावर फेऱ्यांची संख्या कमी केली आहे. त्याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांना बसत आहे.
नवीन गाड्या धावणार, पण विलंबाने
राज्य परिवहन महामंडळ नवीन दोन हजार गाड्या घेणार आहे. यात काही सीएनजीवर धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. मात्र, यासाठी आणखी उशीर लागेल. सीएनजीचा प्रोटोटाईप तयार झाला आहे. येत्या काही दिवसांत डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांचे रूपांतर सीएनजीमध्ये धावणाऱ्या गाडीमध्ये होईल. मात्र, याला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तो पर्यंत प्रवाशांना खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील चित्र
- काही गावांमध्ये एसटी बंद किंवा फेऱ्या कमी केल्या आहेत.
- पासधारक विद्यार्थ्यांना चार ते १० किलोमीटरचा प्रवास करत शेजारच्या गावात जावे लागते
- पेन्शन, दवाखाना, कागदपत्रे आणि इतर कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अनंत अडचणी
- एसटीच्या नकाशातूनच अनेक गावे हद्दपार झाल्याने, प्रवाशांची प्रचंड गैरसोय
ग्रामीण भागातील एसटी सेवेवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, आम्ही लांब पल्ल्याच्या काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्या आहे. बस गाड्यांची संख्या वाढविण्यावर भर देत आहोत. लवकरच स्वतःच्या मालकीच्या ७०० बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई
प्रवासी एसटीपासून दूर जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. संपानंतर एसटीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाले आहेत. एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अन्य पर्यायांवर काम केले पाहिजे. चांगल्या प्रवासासाठी बसची स्थिती चांगली असणे गरजेचे आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
का दुरावले प्रवासी?
१) संपाच्या काळात सेवा बंद
२) प्रवाशांना खासगी वाहनांने प्रवासाची सवय
३) एसटी बसचा दर्जा खालावला
४) खराब गाड्यांतून प्रवास त्रासदायक
५) तिकीट दरात १८ टक्के वाढ
६) खासगी वाहतुकीचे दर एसटीच्या तुलनेत स्वस्त