Pune Tendernama
पुणे

Ajit Pawar : मेट्रोचा विस्तार पुणे जिल्ह्यात होणार का? काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यातील वाहतूक हा यक्षप्रश्न असून तो सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते आणि उड्डाणपूलांची कामे करून तसेच मेट्रोचे जाळे विणण्यात येणार आहे. नागरिकांना या पुलाच्या रूपाने वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या पुलाच्या रूपाने पुणेकरांना स्वातंत्र्य दिनाची आगळीवेगळी भेट मिळाली आहे, भविष्यात पुणे शहरच नव्हे तर पुणे जिल्ह्यातही मेट्रोचे जाळे विणले जाणार असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

सिंहगड रस्ता येथील राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी (ता. १५) अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, बाबा मिसाळ यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवक, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. मुख्य अभियंता युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

पुलाच्या कामातच मेट्रोसाठी खांब उभारण्याची तरतूद आधीच केलेली आहे सुमारे 30 कोटी रुपयांचे काम यात केले आहे . जनता वसाहतचा कालवा रस्ता पूर्ण तयार नसल्यामुळे उड्डाणपूलाच्या कामास उशीर झाला." नदीकाठच्या रस्त्याच्या कामात अजित पवारांनी लक्ष घालावे अशी विनंती आमदार माधुरी मिसाळ यांनी यावेळी केली. तर यापुढेही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून शहरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मिसाळ यांनी संगितले.

"पहिल्या टप्प्यातील उड्डाणपुलाचे उद्घाटन आज होत असून यामध्ये पाचशे वीस मीटरचा पूल विठ्ठलवाडी ते स्वारगेटच्या दिशेचा खुला करण्यात आला आहे. उर्वरित 2.6 किलोमीटरचा पूल मार्च 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. 118 कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या या पुलाचे काम सप्टेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आले होते, असे पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संगितले.

पहिल्या टप्प्यातील पुलाचे काम सप्टेंबर 2023 मध्ये सुरू झाले असून एका वर्षात ते पूर्ण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक देसरडा यांनी केले.

एकता नगरीत सामूहिक विकास क्षेत्र

खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सिहंगड रोडवरील काही भागात पुरपरिस्थिती निर्माण होते. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता या भागात कायमस्वरुपी मार्ग काढण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेने एकता नगरी येथील सामूहिक विकास क्षेत्राविषयी (कलस्टर डेव्हल्पमेंट) सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींनी कामे करतांना राडारोडा नदीपात्रात टाकू नये. नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे बांधकाम करु नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३५ लाख महिलांना लाभ

महिला सबलीकरणाकरीता राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास ३५ लाख माता-भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात ५० लाख महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याच्या प्रयत्न आहे. त्यामुळे महिलांच्या मनात समाधानाची भावना दिसून येत आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथे या योजनेचा राज्यस्तरीय लाभ हस्तांरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही पवार यांनी सांगितले. .

नियंत्रण कक्षाची स्थापना

राज्य सरकारच्यावतीने केंद्रशासनाकडून राज्याच्या विकासाकरीता मोठ्या प्रमाणात निधी आण्याचे काम करण्यात येत आहे. राज्यात रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरीता उपमुख्यमंत्री कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पुण्याच्या लोकसंख्येत वाढ होत असून पाणी, वाहतूक अशा विविध पायाभूत समस्या निर्माण होऊन नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे पुणेकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन ते इच्छितस्थळी वेळेत पोहोचले पाहिजे, याकरीता प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्याकरीता आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या काळात वाहतूक कोडींचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता आढावा बैठक घेण्यात येईल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.