Ajit Pawar Tendernama
पुणे

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्ष घालूनही बारामतीतील 'हा' प्रकल्प का रखडला?

टेंडरनामा ब्युरो

बारामती (Baramati) : बारामती शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रलंबित राहत असल्याचे चित्र आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यात लक्ष घातल्यानंतरही अत्यंत कासवगतीने या प्रकल्पाचे काम सुरू आहे.

कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी हा प्रकल्प तातडीने कार्यान्वित होणे गरजेचे आहे. असे असतानाही वारंवार त्रुटी काढून हा प्रकल्प कसा होणार नाही याचीच काळजी गृहविभागाच्यावतीने घेतली जात असल्याचे चित्र आहे. हा प्रकल्प रखडविण्याचाच प्रयत्न होत असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.

या प्रकल्पाचे टेंडर निघून प्रत्यक्षात काम सुरू होणे अपेक्षित असताना अजूनही याचे टेंडरच निघाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जुलै 2023 मध्ये हाय पॉवर कमिटी मिटींगमध्ये बारामती, कर्जत जामखेड व काटोल शहर या तिन्ही शहराच्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजलमध्ये बदल करण्यासाठी तसेच सुधारीत कार्यादेश निर्गमित करण्याबाबत चर्चा झाली होता.

या मध्ये या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केपीएमजी या प्रकल्प सल्लागारांनी सुचविलेल्या बदलास मान्यता देण्याबाबत यात चर्चा झाली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाबाबत फक्त बैठका आणि बैठकाच झाल्या. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली, मात्र अजूनही या प्रकल्पाचे कागदी घोडेच नाचविले जात असल्याचे चित्र आहे.

सातत्याने या प्रकल्पात बदल सुचविण्यात आले आणि हा प्रकल्प रखडतच गेला. अनेक घटना घडल्यानंतर पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज तपासात मदत करते, मात्र बारामतीत सध्या पोलिसांना दुकानदारांच्या सीसीटीव्ही कॅमे-यांवरच अवलंबून राहावे लागत आहे, त्या मुळे हा प्रकल्प वेगाने मार्गी लागावा अशी मागणी होत आहे.

असा आहे प्रकल्प...

नवीन प्रस्तावात 320 अत्याधुनिक कॅमे-यांच्या माध्यमातून शहरावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मध्ये एकाच नियंत्रण कक्षात बसून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे. या मध्ये 200 कॅमेरे हे कायमस्वरुपी लावले जाणार असून उर्वरित 120 कॅमेरे हे फेस रेकनेसेशन प्रणालीचे असतील. या शिवाय या प्रकल्पात पँरारोमिक, पीटीझेड तसेच एएनपीआर व ड्रोन कॅमेरेही लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीचा स्पष्ट चेहरा दिसावा, नंबरप्लेट दिसून यावी असा प्रयत्न यात होणार आहे.