पिंपरी (Pimpri) : मुळा नदीच्या एका बाजूस पिंपरी-चिंचवड महापालिका आणि दुसऱ्या बाजूस पुणे महापालिका आहे. दोन्ही महापालिकांनी एकत्रित टेंडर (Tender) काढल्यास मुळा नदीकाठ सुधार प्रकल्पाची कामे अधिक जलद आणि प्रभावीरीत्या होऊ शकतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) उभारलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळ पवार बोलत होते.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अंशतः सुटलेला आहे. जागावाटप झाल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची सविस्तर माहिती देऊ. काही इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत असतात, परंतु अंतिम निर्णय निवडणुकीपूर्वी घेतला जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरातून ऑनलाइन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कार्यक्रमात पवार म्हणाले, ‘‘राज्यात सर्वत्र नवरात्री उत्सव सुरू आहे आणि या उत्सवात स्त्री शक्तीचा जागर होतो. भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे प्रतीक मानले जाते. तिची विविध रूपे महाकाली व दुर्गामातेच्या रूपात दिसतात. राष्ट्रनिर्माणामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे.’’
पिंपरी-चिंचवड कष्टकऱ्यांची नगरी आहे. मतदारसंख्या वाढत असल्याने सर्वांसाठी सुविधा उपलब्ध करणे ही काळाची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले.