Ajit Pawar Tendernama
पुणे

Ajit Pawar : लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय; जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लोणावळ्यातील दोन किलोमीटर मार्गाचे नगरपरिषदेच्या निधीतून रुंदीकरण केले जाणार आहे.

‘पीएमआरडीए’ने लोणावळ्यात नऊ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परवानगीसाठी पाठविलेला आहे. त्यास मंजुरी मिळण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले असून, कामास गती देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रालयात नुकताच आढावा घेतला. बैठकीस आमदार सुनील शेळके यांच्यासह वित्त, नियोजन, गृहनिर्माण, ऊर्जा, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांसह आदी उपस्थित होते.

खंडाळ्यासाठी पाच एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लोणावळ्यासाठी विविध नऊ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लोणावळ्यातील दोन किलोमीटर मार्गाचे नगरपरिषदेच्या निधीतून रुंदीकरण होणार आहे.

बैठकीत लोणावळ्यातील महत्त्वाचे निर्णय

- भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनामार्फत १५ कोटी रुपयांचा निधी देणार

- दीर्घकालीन भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्ताप्रकरणी अंबरनाथ नगरपालिकेच्या धर्तीवर दंड आकारून नियमित करण्याबाबत मार्ग काढावा

- स्थानिक रिक्षा, टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, यादृष्टीने ऑनलाइन कॅबचालक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना द्याव्यात

- औद्योगिक वसाहतीमधील विजेची समस्या आणि नगरपरिषदेच्या प्रश्नी चर्चा करण्यात आली

- विकास आराखडा अंतिम करताना हनुमान टेकडी परिसरातील म्हाडा घरकुलांना वाढीव ‘एफएसआय’ देण्याबाबत नगरविकास सचिवांनी संबंधितांची बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करावी