पुणे (Pune) : प्रवाशांना PMPच्या बसचे लाइव्ह लोकेशन (Live Location) समजावे, प्रवाशांना नियोजन करता यावे म्हणून ‘पीएमपी’ प्रशासनाने ‘गुगल’शी (Google) करार केला. त्यानुसार त्यांना आवश्यक असणारी माहिती दिली, मात्र काही केल्या ही सेवा अजूनही सुरू झालेली नाही. गेल्या वर्षभरापासून यासाठीच्या केवळ बैठका झाल्या, पण प्रवाशांना याचा लाभ झालेला नाही. प्रवासी अजूनही गुगल सेवेच्या शोधात आहेत.
बस उशिराने येणे, बस थांब्यावर न थांबणे, वाटेतच बस बंद पडणे असे प्रकार घडत आहेत. प्रवाशांना जोपर्यंत आपल्या बसच्या सेवेबद्दल खात्री वाटणार नाही तोपर्यंत प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार नाही. त्यामुळे ‘पीएमपी’ने गुगलशी करार करून बसचे लाइव्ह लोकेशन समजावे म्हणून प्रयत्न सुरू केले. मात्र, अद्याप त्याची सेवा तर दूरच साधी चाचणी देखील झालेली नाही.
‘आयटीएमएस’ मर्यादित
आयटीएमएस (इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) यंत्रणा काही वर्षांपूर्वी ‘पीएमपी’मध्ये सुरु होती. आता देखील ती काही प्रमाणात सुरू आहे. मात्र, ती ‘पीएमपी’ प्रशासनापुरतीच मर्यादित आहे. याचा कोणताही फायदा प्रवाशांना होत नाही. या प्रणालीमुळे बसमधील प्रवाशांना पुढचा थांबा कोणता आहे, कोणत्या थांब्यावर बस उभी आहे, चालकाने कोणत्या थांब्यावर बस थांबवली नाही, बसचा वेग या बाबतची माहिती प्रवाशांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र ही सेवा सुरूच झालेलीच नाही.
काय आहे स्थिती
- गेल्या आठ महिन्यांपासून गुगल व ‘पीएमपी’ यांच्यात बसचे लाइव्ह लोकेशन संदर्भात बैठक होत आहे.
- ‘पीएमपी’चे सुमारे नऊ हजार थांब्याची माहिती व ठिकाण याची माहिती ‘गुगल’ला देण्यात आली.
- ‘गुगल’ला आणखी काही माहिती हवी आहे. ते देण्यास ‘पीएमपी’ असमर्थ ठरत आहे.
- ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या बस आणि ठेकेदारांच्या बस यांच्यातील यंत्रणा वेगळी आहे.
- ही सर्व यंत्रणा एकत्रित करण्याचे काम केले गेले, पण त्यात यश आलेले नाही.
- प्रायोगिक स्तरावर ‘पीएमपी’च्या स्वतः मालकीच्या ज्या बस आहेत. त्यात तरी लाइव्ह लोकेशन दाखविणारी यंत्रणा बसवावी अशी मागणी होत आहे.
- मात्र, त्यावर ‘पीएमपी’ने अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही.
‘गुगल’संदर्भात मी लवकरच बैठक घेणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे दिरंगाई झालेली आहे. बैठकीनंतर कारणे स्पष्ट होतील, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.
- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे