Pune Metro Tendernama
पुणे

पुणेरी मिसळ, पुणेरी पावभाजीच्या तुफान यशानंतर आता 'पुणेरी मेट्रो'!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे (Hinjawadi - Shivajinar Metro) ‘पुणेरी मेट्रो’ असे नामकरण करण्यात आले आहे. या मेट्रो मार्गाची माहिती एका क्लिकवर नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठीच्या संकेतस्थळाचे उदघाटन ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’चे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांच्या गुरुवारी झाले.

टाटा समूहाची स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी असलेल्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यातर्फे सुमारे २३ किलोमीटर मेट्रोचे काम दोन्ही शहरांत सुरू आहे. संकेतस्थळाच्या उदघाटन प्रसंगी ‘पीआयटीसीएमआरएल’च्या बिझनेस हेड व संचालिका नेहा पंडित, ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, अधीक्षक अभियंता रिनाज पठाण, भारतकुमार बाविस्कर आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३साठीचे संकेतस्थळ बनविताना ते नागरिकांना वापरासाठी सोपे (यूजर फ्रेंडली) असेल. नागरिकांसाठी आकर्षक व आवश्यक माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देणारे असेल याची दक्षता घेण्यात आलेली आहे, असे पंडित यांनी सांगितले.