Deccan Queen Tendernama
पुणे

तब्बल 57 वर्षांनी सजली Deccan Queen; असे आहे नवे रंगरूप...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणेकरांची लाडकी ‘दख्खनची राणी’ अर्थात ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेस (Deccan Queen Express) आजपासून (ता. २३) नवीन साज अर्थात नव्या ढंगात व रंगात धावणार आहे. बुधवारी मुंबईहून पुण्याला येतानाच नवा एलएचबी रेक डेक्कन क्वीनला जोडण्यात आला. तब्बल ५७ वर्षानंतर ‘आयसीएफ’चे डबे जाऊन आता नवे एलएचबी डबे जोडले गेले. गेल्या ९३ वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेत धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या प्रवासातला हा महत्त्वाचा टप्पा आहे.

देशांत नवद्दी ओलांडलेल्या केवळ दोनच रेल्वे धावत आहेत. पहिली पंजाब मेल आणि दुसरी डेक्कन क्वीन. पंजाब मेलला या आधीच एलएचबी रेक जोडण्यात आले. आता डेक्कन क्वीनने देखील एलएचबी, तो देखील विशेष रंगसंगती असलेला रेक जोडून आपलं रूप पालटले आहे. हिरव्या आणि लाल रंगाने सजलेले डबे व डायनिंग कार हे नव्या गाडीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. डेक्कन क्वीन ही हेरिटेज रेल्वे असल्याने अहमदाबाद येथील एनआयडीने (नॅशनल इन्स्टिट्यूट डिझाइन) याचे आरेखन केले आहे. तिची नवी रंगसंगती एनआयडीने निवडली आहे. अशा प्रकारची ही देशातील पहिली रेल्वे आहे. चेन्नईतल्या आयसीएफ कारखान्यात या गाडीच्या डब्यांची निर्मिती झाली आहे.

डेक्कन क्वीनला विशेष दर्जा असल्याने रेल्वे बोर्डाने या गाडीच्या डब्याला सामान्य डब्याचा रंग न देता हिरव्या व लाल रंगाचा साज दिला आहे. हा बदल करताना डायनिंग कारमध्येही थोडा बदल केला आहे. पूर्वी कारमधील प्रवासी क्षमता फक्त ३२ होती, ती आता वाढवून ४० केली आहे.

कसा झाला डेक्कन क्वीनचा प्रवास?
१ जून १९३० या दिवशी डेक्कन क्वीनने आपला पहिला प्रवास पूर्ण केला. सुरूवातीला रेल्वेत केवळ दोन श्रेणी होत्या. यात प्रथम व द्वितीय श्रेणीचे मिळून सात डबे होते. १९५५ साली तृतीय म्हणजे आजचा जनरल क्लास सुरू झाला. १९६६ साली आयसीएफ कोच जोडण्यात आले. त्यावेळी डब्यांची संख्या सातवरून १२ करण्यात आली. १५ ऑगस्ट २०२१ रोजी विस्टाडोम डबा जोडण्यात आला.

रेल्वेच्या शिरपेचातला मनाचा मानाचा तुरा
भारतीय रेल्वेच्या १६९ वर्षांच्या प्रवासात डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे स्थान वेगळे आहे. डेक्कन क्वीन ही भारतातील पहिली सुपरफास्ट दर्जाची रेल्वे आहे. पहिली लांब पल्याच्या मार्गावर विजेवर धावणारी रेल्वे, देशात वेस्टीब्युलचा वापर डेक्कन क्वीन मध्येच झाला, डायनिंग कार असलेली देशातील एकमेव रेल्वे आदी विविध वैशिष्ट्ये डेक्कन क्वीनच्या बाबतीत आहेत.

अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी पूर्ण झाली. बुधवारी पुणे ते मुंबई डेक्कन क्वीनचा जुन्या आयसीएफ डब्यांसोबतचा शेवटचा प्रवास झाला. गुरुवारपासून नवीन रेकमधून पुणेकरांना प्रवास करता येणार आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई