पुणे (Pune) : भूमी अभिलेख (Land Record) विभागाच्या शिरपेचात नव्याने मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल एक लाख ६४ हजार ७४२ डिजिटल सेवेचा घरबसल्या नागरिकांनी लाभ घेतल्याने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाला ३१ लाखांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे.
राज्याच्या महसूल विभागाकडून नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भूमी अभिलेख विभाग अग्रेसर असून, डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, आठ-अ, फेरफार उतारे आणि प्रॉपर्टी कार्ड घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत.
जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार किंवा इतर स्थावर मालमत्तेसंदर्भातील कामकाजासाठी तसेच पीक विमा, बियाणे खरेदी, नुकसानीच्या पंचनामान्यासाठी लागणारे कागदपत्रे सहज उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑनलाइन डिजिटल सातबारा, आठ-अ किंवा फेरफार उतारा डाऊनलोड करण्यासाठी विभागाकडून केवळ १५ रुपये शुल्क आकारले जाते, तर प्रॉपर्टी कार्डसाठी १३५ रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यातून भूमी अभिलेख विभागाला ३१ लाख २९ हजार १२० रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.
विशेष म्हणजे राज्यभरात सर्वाधिक ऑनलाइन सेवेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये पुणे जिल्हा अव्वल असून, मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. नागरिकांना या सुविधेचा सहजतेने व कमी वेळेत लाभ घेणे शक्य होत असून, विभागाला देखील उत्पन्न प्राप्त होत आहे.
- सरिता नरके, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
घरबसल्या घेतला नागरिकांनी लाभ
(प्रकार डाऊनलोड उत्पन्न)
सातबारा : १,१७,६२९ १७ लाख ६४ हजार ४३५
आठ-अ : ३५,४८९ ५ लाख ३२ हजार ३३५
फेरफार : २,४६२ ३६ हजार ९३०
प्रॉपर्टी कार्ड : ५,८९२ ७ लाख ९५ हजार ४२०
एकूण : १,६१,४७२ ३१ लाख २९ हजार १२०