Sambhaji Maharaj Tendernama
पुणे

३४३ कोटींतून संभाजी महाराजांच्या स्मारकासह वढू-तुळापुरचा कायापालट

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासह श्रीक्षेत्र वढू बुद्रुक-तुळापूरच्या सर्वांगिण विकास आराखड्यासाठी ३४३ कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्याचे सादरीकरण नुकतेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. आराखड्यानुसार निधीचा विनियोग झाला तर त्यातून श्रीक्षेत्र वढू-तुळापुरचा कायापालट होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आणि समाधीस्थळ परिसराच्या विकासासाठी एकूण आराखड्यापैकी २६९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. त्यानंतर विकास आराखड्याचे पुण्यात आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत वढू-तुळापुरच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता बी. एन. बहीर तसेच कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, अभियंता मयूर सोनवणे हेही उपस्थित होते. यावेळी वास्तुविशारद हेमंत पाटील यांनी विकास आराखड्याचे सादरीकरणही केले.

आराखड्यातील ठळक वैशिष्ट्ये..

१) समाधिस्थळाच्या मूळ रचनेत बदल न करता स्मारक उभारणी

२) आकर्षक दगडी प्रवेशद्वार, दगडी संरक्षक भिंती तसेच पार्किंग

३) छत्रपती शंभुराजांचे दगडी भिंतीत भव्य शिल्प

३) मराठा शैलीत प्रवेशद्वार, सदर बाजार व प्रशासकीय इमारत

५) घाट परिसराचे आकर्षक सुशोभीकरण होणार

६) वढू - तुळापूरला दोन पुलाद्वारे जोडणार.

८) पर्यटकांना ट्रेन्डी शोद्वारे शंभुराजांचा जीवनपट पाहण्याची सोय

९) ट्रान्सस्क्रिप्टद्वारे परदेशी भाषेतही माहिती ऐकण्याची सुविधा

९) रात्रीच्या वेळी लाइट अँड साऊंड शो.

१०) वढूच ते तुळापूर दरम्यान ब्रीज कम बंधारा बांधणार

११) तुळापूरात दर्शनी भागात पुतळा, इंटरॲक्टीव्ह म्युझियम

१२) वढू येथे केईएम रुग्णालयाची जागा स्मारकासाठी उपलब्ध होणार

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्यानुसार काम सुंदर आणि भव्य होईल. याकडे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विशेष लक्ष द्यावे. तसेच मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांसाठी वाहनतळ व सुविधांचेही योग्य नियोजन करावे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने दिलेल्या ३४३ कोटी रुपयांच्या निधीमुळे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक हे निश्चितच आंतरराष्ट्रीय दर्जाचे होईल. तसेच भव्य रस्ते, भीमा नदीवरील पूल आदी कामांमुळे श्रीक्षेत्र वढू बुद्रुक व तुळापूर परिसराचा कायापालट होणार आहे.

- अशोक पवार, आमदार-शिरूच - हवेली