Satara

 

Tendernama

पश्चिम महाराष्ट्र

टेंडर प्रक्रियेआधीच कामाची लगीनघाई

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : जाहिर केलेली टेंडर प्रक्रिया पुर्ण होण्‍याआधीच किडगाव (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेच्‍या संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्‍यात आल्‍याचे समोर आले. याबाबत ग्रामस्‍थांनी ग्रामपंचायतीस विचारणा केली असता, त्‍यांना ते काम कोणी सुरु केले आहे, याची माहिती नसल्‍याचे लेखी उत्तर देण्‍यात आले. यामुळे त्‍याठिकाणच्‍या ग्रामस्‍थांनी याची लेखी तक्रार सातारा जिल्‍हाधिकारी आणि सातारा पंचायत समितीच्‍या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सातारा तालुक्‍यातील राजकीयद्दष्‍ट्‍या संवेदनशील गाव म्‍हणून किडगावची ओळख आहे. येथील ग्रामपंचायतीने गावात असणाऱ्या प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत बांधणे, अंगणवाडीसमोर काँक्रिटीकरण करणे तसेच फरशी बसविणे, स्‍मानभूमीची डागडुजी करणे आदी कामे पंधराव्‍या वित्त आयोगातून करण्‍याचे ठरवले होते. या नुसार त्‍यासाठीची टेंडर प्रक्रिया जाहीर करत काम करण्‍यासाठी ठेकेदारांकडून टेंडर लखोटे मागवले. हे लखोटे सादर करण्‍यासाठी ग्रामपंचायतीच्‍यावतीने १२ जानेवारी ही शेवटची मुदत देण्‍यात आली होती. १२ तारखेपर्यंत आलेल्‍या लखोट्यांची छानणी होवून ता. १३ ला योग्‍य दरात टेंडर देणाऱ्या ठेकेदारास काम देण्‍यात येणार असल्‍याचे ग्रामपंचायतीच्‍यावतीने जाहीर करण्‍यात आले होते.

टेंडर प्रक्रिया पुर्ण होण्‍याआधीच तीन लाख रुपये खर्चाची तरतुद असणारे शाळेभोवती संरक्षक भिंत बांधण्‍याचे काम ता. १० जानेवारीला कोणीतरी सुरु केल्‍याचे ग्रामस्‍थांच्‍या निदर्शनास आले. यामुळे ग्रामस्‍थांनी त्‍याठिकाणी काम करणाऱ्यांकडे चौकशी करत काम कोण करतेय, कोणी करण्‍यास परवानगी दिली, आदी माहिती विचारली, मात्र त्‍याठिकाणच्‍या कामगारांनी ग्रामस्‍थांना योग्‍य माहिती दिली नाही.

यामुळे किडगाव येथील गौरव इंगवले व इतर ग्रामस्‍थांनी सरपंच आणि ग्रामसेवकांकडे त्‍याबाबत विचारणा करत लेखी अर्ज केला. या लेखी अर्जावरील उत्तर ग्रामपंचायतीच्‍यावतीने ता. २ फेब्रुवारी रोजी गौरव इंगवले व इतरांना देण्‍यात आले. यात प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत बांधण्‍याचे कामाची वर्कऑर्डर कोणालाही देण्‍यात आली नाही. त्‍याकामावर ग्रामपंचायतीन कोणताही निधी खर्च केला नसून ते काम कोणी केले, याबाबतची कोणतीही माहिती किडगाव ग्रामपंचायतीस नसल्‍याचे नमुद करण्‍यात आले आहे. एकंदरच ग्रामपंचायत कार्यकारिणी व इतरांच्‍या कार्यपध्‍दतीविषयी शंका निर्माण झाल्‍याने याची तक्रार नंतर गौरव इंगवले व इतर ग्रामस्‍थांनी दोन दिवसांपूर्वी सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली. यावरील सुनावणीत काय समोर येते, त्‍यात कोण गुंतले आहे, याकडे किडगाव ग्रामस्‍थांचे लक्ष लागून राहिले आहे. टेंडर प्रक्रिया पुर्ण होण्‍याआधीच कामाची लगीनघाई उडवून देणाऱ्या किडगाव येथील प्रकाराची जिल्‍ह्‍यात चर्चा सुरु आहे.

रातोरात उभारलेले सांगडे गायब

किडगाव येथील शाळेचे संरक्षक भिंतीचे काम निविदा प्रक्रिया पुर्ण होण्‍याआधीच सुरु करण्‍यात आल्‍याचे समोर आल्‍यानंतर काही ग्रामस्‍थांनी याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली. या तक्रारीमुळे गावात खळबळ उडाली असतानाच ते काम करणाऱ्याने शाळेच्‍या संरक्षक भिंतीसाठी उभारावयाच्‍या पिलरचे लोखंडी सांगाडे आणि जाळ्या रातोरात त्‍याठिकाणी गायब केल्‍याचे दिसून येत आहे.