school uniform Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

शाळेने का नाकारले 'ते' गणवेश? शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली

टेंडरनामा ब्युरो

राहुरी (Rahuri) : वळण (ता. राहुरी) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने (ZP School) शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत पुरविलेले निकृष्ट गणवेश नाकारले. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) केलेली गणवेशाची कापड खरेदी व शिलाई वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याची डोकेदुखी वाढली आहे.

माविमतर्फे एप्रिल महिन्यात तालुका स्तरावर गणवेशाचे कापड साईजनुसार कापून शिवायला देण्यात आले. ४० दिवसांत शिलाईचे काम पूर्ण करणे बंधनकारक होते. स्थानिक महिलांना रोजगार मिळावा, या उद्देशाने स्थानिक महिला बचत गटांना शिलाईचे काम देणे बंधनकारक होते. जून महिन्यात शाळा उघडल्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे अपेक्षित होते.

परंतु सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उलटला, तरी सर्व शाळांना गणवेश मिळाले नाहीत. गणवेश शिलाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकांची समिती गठित केली आहे. परंतु माविमच्या प्रतिनिधीने कोणत्या बचत गटांना काम दिले. याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना दिली नाही.

शासनाने प्रती गणवेश शिलाई दर १०० रुपये व आनुषंगिक खर्च १० रुपये असा एकूण ११० रुपये खर्च मंजूर केला आहे. प्रत्यक्षात बचत गटांना प्रतिगणवेश शिलाईची रक्कम किती दराने देण्यात आली, याची चौकशी होण्याची गरज आहे.

कापडाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

माविममार्फत ई-टेंडर पद्धतीने कापड खरेदी करण्यात आले. त्यात काही मुलींचे ब्लाऊज व मुलांच्या शर्टचे कापड जुनाट, जीर्ण असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी गणवेश अंगात घातल्यावर आपोआप चिरल्याने कापडाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गणवेशाच्या कापडाचे फॅब्रिक आयएस १५८५२ (शर्टिंग), आयएस १५८५३ (शूटिंग) गुणवत्तेचे आयएसओ मानांकन प्रमाणपत्र असलेले असावे, असे निर्देश आहेत. पुरविलेले कापड शिक्षण विभागाने शासकीय प्रयोगशाळेत तपासून गुणवत्तेची खात्री करणे आवश्यक होते.

शिलाई मध्ये त्रुटी

पिनो फ्रॉकला छातीवर अस्तर लावले नाही. पिनो फ्रॉक, शर्ट अर्धेच ओव्हरलॉक केले. शर्टच्या मुंड्याला ओव्हरलॉक केले नाही. शर्ट, पिनो फ्रॉकला इस्त्री केलेली नाही. हाफ पॅन्टचे बक्कल घालण्याआधीच निघत आहेत. काही शर्टचे खिसे तिरपे शिवले आहेत. १६ नंबरच्या काही पॅन्टवर १८ नंबरचे लेबल लावले आहेत. शिलाईची मोठी टीप आहे, टेलरसारखी छोटी टीप नाही. त्यामुळे शिलाई उसवत आहे. प्रत्येक गणवेश प्लास्टिक पिशवीत घातलेला नाही.

विद्यार्थ्यांच्या गणवेशात गैरव्यवहार झाला आहे. कापड व शिलाई निकृष्ट दर्जाचे आहे. खोके सरकारने मोठा गणवेश घोटाळा केला आहे. पाचवी ते आठवीच्या मुलींना गणवेशाचा स्कर्ट गुडघ्याच्या वर आहे. असे तोकडे गणवेश घालण्यास ग्रामीण भागातील मुली व पालक नकार देतात.

- प्राजक्त तनपुरे, आमदार, राहुरी.

माविमच्या प्रतिनिधीला एप्रिल महिन्यापासून कोणत्या बचत गटाला गणवेश शिलाईचे काम दिले. याची माहिती विचारत आहे. परंतु माहिती मिळाली नाही. त्यामुळे शिलाई कामाच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करता आली नाही. ४० दिवसांत गणवेश पुरविणे बंधनकारक होते. चार महिने गणवेश मिळाले नाहीत. त्याबद्दल लेखी विचारणा केली जाईल.

- मोहनीराज तुंबारे, गट शिक्षणाधिकारी, राहुरी.

वळण जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गांची २२५ पटसंख्या आहे. मुलींना गुडघ्याच्या वर असलेले स्कर्ट घालण्यास पालकांचा नकार आहे. निकृष्ट कापड व शिलाईमुळे गणवेश नाकारले आहेत.

- गोविंद फुणगे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वळण.

एप्रिल महिन्यात मुलींचे ब्लाऊज व स्कर्ट शिवण्यासाठी १२४७ गणवेशांचे कापलेले कापड मिळाले. माविमचे प्रतिनिधी महेश आबुज यांनी शिलाईचे दर ब्लाऊज ४० रुपये ५० पैसे व स्कर्ट ३८ रुपये ५० पैसे असे ७९ रुपये प्रती गणवेश प्रमाणे असल्याचे सांगितले. काम पूर्ण केले आहे. शिलाईची काही रक्कम येणेबाकी आहे.

- वैशाली धसाळ, श्री स्वामी समर्थ महिला बचत गट, आरडगाव.