Satara Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

घंटागाडीचे एवढ्या कोटींचे टेंडर कोणाला मिळणार?

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : सातारा शहर (Satara city) आणि परिसरातील कचरा संकलन करण्‍यासाठी सातारा नगरपालिकेमार्फत (Satara Nagar Palika) खासगी ठेकेदार (Contractor) नेमण्‍यात आला होता. या ठेकेदाराचा कार्य कालावधी संपुष्‍टात आल्‍याने ठेकेदार नियुक्‍तीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली असू्न, त्‍याबाबतची अंतिम कार्यवाही आज (ता. १) सातारा पालिकेत मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांच्‍या उपस्‍थितीत पार पाडण्‍यात येणार आहे. कचरा संकलन करण्‍यासाठीचे हे सहा कोटींचे टेंडर कुणाला मिळणार, याकडे पालिका प्रशासनासह सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा शहर आणि परिसरातील कचरा संकलनाचे काम पालिकेच्‍या वतीने ‘भाग्‍यदीप’ या संस्‍थेस देण्‍यात आले होते. काम दिल्‍यानंतर त्‍या ठेकेदाराकडे पालिकेच्‍या ४० घंटागाड्या सोपविण्‍यात आल्‍या होत्‍या. या घंटागाड्यांच्‍या मदतीने शहराच्‍या विविध भागातील कचरा संकलन करत तो सोनगाव कचरा डेपोत प्रक्रियेसाठी पोचविण्‍याची जबाबदारी त्‍या ठेकेदारास देण्‍यात आली होती. या ठेक्‍याची मुदत संपल्‍यानंतर पालिकेने त्‍या कामासाठीची फेर टेंडर काढण्‍याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी दर मंजुरीचा विषय हा जीवन प्राधिकरणाच्‍या मार्गदर्शन सूचनांनुसार पूर्ण करण्‍यात येणार होता. मात्र, त्‍यासाठी बराच कालावधी लागला. दर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर ती फाईल जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांच्‍याकडे पालिका प्रशासनाने सादर केली. या फाईलला मंजुरी दिल्‍यानंतर पालिकेने त्‍यासाठीची प्रक्रिया सुरू केली.

त्यानुसार जाहीर झालेल्‍या टेंडर प्रक्रियेवरील अंतिम कार्यवाही उद्या सातारा पालिकेत होणार आहे. सुमारे सहा कोटी रुपयांचे हे टेंडर कोणत्‍या कंपनीस मिळणार, याकडे पालिका प्रशासनासह सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. पालिकेने स्‍वत:च्‍या ४० घंटागाड्या सध्‍या कार्यरत असणाऱ्या ठेकेदारास वापरासाठी दिल्‍या होत्‍या. या घंटागाड्या पुन्‍हा एकदा पालिका ताब्‍यात घेणार आहे. या गाड्या ताब्‍यात घेण्‍यापूर्वी त्‍या घंटागाड्यांची तांत्रिक तपासणी करून त्‍याचे प्रमाणपत्र सादर करण्‍याचे आदेशही पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारास दिले आहेत.

शौचालय स्‍वच्‍छतेसाठी ४ कोटी
कचरा संकलनासाठी सुमारे ६ कोटी रुपयांचे टेंडर पालिकेच्‍या वतीने जाहीर करण्‍यात आले होते. ही प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात असून त्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्‍वच्‍छता व इतर कामांसाठीचे ४ कोटींची टेंडर काढण्‍याची प्रक्रिया पालिकास्‍तरावर पार पाडण्‍यात येणार आहे. या टेंडरच्‍यावेळी देखील मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणीस पुन्‍हा एकदा वेग येण्‍याची शक्‍यता आहे.