महाड (Mahad) : वरंधा घाटातील (Varandha Ghat) महाड (जि. रायगड) हद्दीत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्ता ३० मेपर्यंत बंद केला आहे.
यामुळे भोर-महाड मार्गावरील देवघर, वेणुपुरी, कोंढरी आदी तालुक्यातील नागरिकांची प्रवासाची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे महाडमार्गावरील गावांसाठी राज्य परिवहन महामंडळाची बस सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
कामधंद्यासाठी पुण्यात असलेले कोकणवासीय, तसेच रोजच पुणे व इतर ठिकाणाहून वरंधा घाट मार्गे ये जा करत असणारी तरकारी, किराणा व इतर माल वाहतूक करणारी वाहने, महाड एमआयडीसीसाठी माल वाहतूक करणारी वाहने यांना आता महाबळेश्वर पोलादपूर मार्गे किंवा ताम्हिणी घाट मार्गे जास्तीचे अंतरावरून प्रवास करावा लागणार असल्याने जास्तीचा वेळ, इंधन लागणार असल्याने दोन महिने आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
भोर तालुक्यातील देवघर, वेणुपुरी, कोंढरी, हिर्डोशी, कारुंगण, वारवंड, शिरगाव, आशिंपी, उंबर्डे, शिळिंब, कुंड, राजीवडी तसेच अभेपुरी, चौधरीवाडी, दुर्गाडी आदी गावातील नागरिकांना या भोर-महाड मार्गाचा दळणवळणास उपयोग होतो. परंतु घाट बंद झाल्याने मार्गावरील एसटी बसेस, खासगी वाहने बंद झाली आहेत.
दरम्यान, सुट्या लागेपर्यंत शाळेतील मुलांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे मुक्कामी शिळिंब व्यतिरिक्त सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीन एसटी बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
भोरवरून सुटणारी व सकाळी लवकर भोरकडे जाणारी मुक्कामी शिळिंब एसटी बस सोडली तर कोणतेही वाहन देवघर भागात नसल्याने नागरिकांना बाजारहाट, दवाखाना, शासकीय कामे तसेच इतर कामांसाठी गावाहून भोर तसेच भोरहून गावाकडे जाण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. वेळप्रसंगी खासगी वाहनांना जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागणार असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.