कऱ्हाड (Karhad) : सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे- बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी बाह्यवळण रस्ते करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संबंधित महामार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या रस्त्यावरून अवजड वाहने जाऊन तो रस्ता काही ठिकाणी खचल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यावरूनच सध्या वाहतूक सुरू असल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. महामार्ग सुस्थितीत नसतानाही टोलची मात्र, आकारणी नियमितपणे केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय महामार्ग विभागानेही त्याबाबत डोळेझाकच केल्याने वाहनधारकांची गैरसोय होत असूनही वरून टोलचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
पुणे-बंगळूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना ते बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर करण्यात आले. त्याअंतर्गत हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गावर संबंधित ठेकेदाराने घातलेले पैसे निघण्यासाठी टोल वसुली सुरू करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी येथील टोल नाक्यावरून टोलची वसुली सुरू आहे. मध्यंतरी केंद्रीय महामार्ग विभागाकडून संबंधित महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आली. त्याअंतर्गत सहापदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी रस्त्याला बाह्यवळण देण्यात आले आहे. पावसाने काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचल्यासारखा झाला आहे. त्यातूनच वाहनधारकांना वाहने घेऊन जावी लागत आहेत. रस्त्याची स्थिती चांगली नसतानाही टोल मात्र, नियमितपणे वाहनधारकांकडून वसूल केला जात आहे. रस्ता सुस्थितीत नसतानाही टोल वसूल केला जात असतानाही त्याकडे महामार्ग विभागाकडून डोळेझाकच करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
टोल कशासाठी द्यायचा असतो?
केंद्रीय महामार्ग विभागाने रस्त्यांचे बांधा, वापरा आणि हस्तांतर करा, या तत्त्वावर रस्ता करण्याचे टेंडर दिले आहे. संबंधित ठेकेदारांमार्फत रस्ता वाहतुकीस चांगला तयार करून तो वाहनधारकांना उपलब्ध करून देण्यात येतो. त्या रस्त्याचा वापर केला म्हणून त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांकडून टोल आकारणी केली जाते. त्यातून वाहनधारकांचा आणि प्रवाशांची वेळ वाचण्यास मदत होते. त्यामुळे टोलची आकारणी केली जाते. सध्या मात्र, त्याउलट स्थिती आहे. रस्ता सुस्थितीत नसतानाही टोलची आकारणी केली जात असल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे.
वाहनांचे, प्रवाशांचेही शारीरिक नुकसान
महामार्गाच्या कामादरम्यान काही ठिकाणी रस्ता करण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. जो रस्ता तयार झाला आहे आणि जेथून जुना रस्ता सुरू होतो. त्याचदरम्यान चढउतार आहे. तेथे गाडी आपटत आहे. त्यामुळे गाडीलाही दणका बसून गाडीचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाला आहे. गाडी वेगात असताना गाडीला अचानक दणका बसत असल्याने गाडातील प्रवाशांनाही त्याचा दणका बसत असल्याने त्यांनाही विशेषतः ज्येष्ठ महिला, नागरिकांनाही शारीरिक इजा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संसदेत, विधानसभेत आवाज उठवूनही...
पुणे-बंगळूर महामार्गावरील जिल्ह्यात दोन टोलनाके आहेत. त्याऐवजी जिल्ह्यात एकच टोलनाका करावा, अशी मागणी तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत, तर आमदार बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत केली होती. त्या दोन्ही लोकप्रतिनिधींची मागणी लोकसभा आणि विधानसभेच्या रेकॉर्डवर आहे. त्याचबरोबर प्राधान्याने खड्डे बुजवून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ करावे, तसेच रस्ता पूर्णपणे अपघातमुक्त करावा, असेही त्यांनी सूचीत केले होते. त्यावर मात्र, महामार्ग विभागाने कार्यवाही केल्याचे दिसत नाही. त्यामुळे संसदेत आणि विधानसभेत आवाज उठवूनही कार्यवाही शून्यच झाली आहे.
मुळातच सातारा जिल्ह्यातील टोलनाके चुकीचे आहेत. वाहनधारकांना खड्डेविरहित रस्ता वापरायला मिळावा, यासाठी टोल आकारला जातो. मात्र, सध्या डायव्हर्शन करून रस्त्यांवर खड्डे पडले असतानाही टोल आकारला जात आहे, हे चुकीचे आहे.
- बाळासाहेब पाटील, आमदार
केंद्र सरकारमार्फत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यातून रस्ते चांगले होणार आहेत. सध्या रस्त्यांवर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ते नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करणे गरजेचे आहे.
- अतुल भोसले, भाजप नेते, कऱ्हाड