Radhakrishna Vikhe Patil Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Tender: अहमदनगर-मनमाड महामार्गाची दुरावस्थेबाबत काय म्हणाले मंत्री विखे?

टेंडरनामा ब्युरो

अहमदनगर (Ahmednagar) : अहमदनगर-मनमाड महामार्गाची दुरावस्था झाली आहे, याकडे लक्ष वेधले असता, या महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते विकास विभागाकडे सोपविण्यात आले आहे. त्यांच्याकडून टेंडर (Tender) प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती सुरू आहे. त्यासाठी ९ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. खासदार नीलेश लंके यांनी हा निधी आणल्याचे जाहीर केले होते, त्यावर विखे म्हणाले, या निधीचे कोण श्रेय घेतो, या वादात जायचे नाही. परंतु, हा निधी अगोदरच मंजूर झालेला आहे.

पालकमंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते विनायक देशमुख यावेळी उपस्थित होते. मंत्री विखे यांनी विविध राजकीय विषयांवर भूमिका स्पष्ट केली.

मंत्री विखे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेस राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ११ लाख ३६ हजार ९४४ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सुमारे दहा लाख बहिणींना प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरूवात केली आहे. सव्वालाख बहिणींची प्रकरणे आधार लिंक नसणे, बँक खाते बंद असे, अशा तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहेत.

या तांत्रिक त्रुटी लवकरात-लवकर दूर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. उर्वरित बहिणींना लवकरच लाभ दिला जाईल. या योजनेमुळे बहिणींचा भावांवरील विश्‍वास वाढला आहे. त्यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते निराधार आरोप करत आहेत, असे ते म्हणाले.