राहुरी (Rahuri) : सरकारच्या २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेचा फज्जा उडाला आहे. दोन गणवेश जून महिन्याच्या ऐवजी सप्टेंबर महिन्यात एक गणवेश मिळत आहेत. त्याचे कापड निकृष्ट दर्जाचे; शिलाई निकृष्ट दर्जाची आहे. गणवेश रचनेनुसार विद्यार्थ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रीप नाहीत. दोन खिसे ऐवजी एकच खिसा लावला आहे.
शर्टचे कापड हलक्या दर्जाचे असल्याने अंगात घालताच फाटत आहे. पहिल्याच दिवशी शिलाई उधडत आहे. असे गणवेश वर्षभर टिकणार कसे? असा प्रश्न शिक्षक व पालकांसमोर उभा ठाकला आहे.
सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यात, शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान रंगाचे दोन गणवेश शाळा उघडण्याच्या पहिल्या दिवशी देण्यात यावेत.
स्काऊट व गाईड विषयाला अनुरूप मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट/पॅन्ट तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा सलवार, कमीज अशी रचना ठरली. त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रीप व दोन खिसे असावे, असे निर्देश देण्यात आले. प्रत्यक्षात योजनेच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
एक रंग, एक दर्जा करिता प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे ई-टेंडर प्रक्रियेद्वारे सर्वात कमी रकमेच्या टेंडरमधून निकृष्ट दर्जाचे कापड खरेदी करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने स्थानिक महिला बचत गटातर्फे गणवेश शिलाईचे काम देण्याचे ठरले. परंतु, शिलाईला विलंब झाल्याने महिला बचत गटांबरोबर खासगी ठेकेदाराकडून गणवेशांची शिलाई करण्यात आली. त्यात, शर्टच्या शोल्डर स्ट्रीप व एक खिसा गायब झाला.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राहुरी खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. त्यांच्यासमोर शिक्षकांनी गणवेशाच्या तक्रारीचा पाढा वाचला. कापड हलक्या दर्जाचे आहे. विद्यार्थ्यांनी अंगात घालताच काही गणवेश फाटले. आडमाप शिवले. वरच्या वर्गाचे गणवेश खालच्या वर्गाला द्यावे लागले. शर्टचा अर्धा भाग गडद व अर्धा भाग फिकट आकाशी रंगाचा, तकलादू लांब अंतराची शिलाई असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
उर्दू शाळेच्या शिक्षिकेने ‘मुलांना फूल पॅन्ट व मुलींना सलवार कमीज मिळावा. मुलींना स्कर्ट व मुलांना हाफ पॅन्ट असा गणवेश नको', असे स्पष्टपणे सांगितले. वस्तुस्थिती पाहिल्यावर तनपुरे यांनी कपाळाला हात लावून शासनाचे गणवेश धोरण फसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.