सांगली (Sangli) : महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती स्तरावर पुन्हा टेंडर मॅनेज केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. मिरजेतील प्रभाग समिती चारमधील जाहीर प्रकटन क्रमांक ९ मॅनेज झाल्याचा पुरावा पुढे आला आहे. याबाबत आज नागरिक जागृती मंचच्यावतीने आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी मिरज शहरातील शिवाजी चौक ते बॉम्बे बेकरी, मिरज शहर पोलिस ठाणे, दत्त चौक ते गाडवे चौक या रस्त्याला पार्किंग सुविधेसाठी पेंट पट्टे मारणे (१.७१ लाख), मिरज शहरातील मिरज मार्केट ते ते तहसिल कार्यालय, गांधी चौक ते शिवाजी चौक, गांधी चौक ते बॉम्बे बेकरी, फुलारे चौक ते बोकड चौक या रस्त्यास पार्किंग पट्टे मारणे (२.९९ लाख), मिरज शहरातील जवाहर चौक ते शास्त्री चौक, ते दत्त चौक रस्त्यास पार्किंग पेंट करणे (२.९९ लाख) अशी तीन कामे प्रस्तावित होती. ७ जानेवारीला या कामासाठीचे प्रकटन महापालिकेच्या संकेतस्थळावर करण्यात आले. यासाठी टेंडर दाखल करण्याची मुदत १८ जानेवारीपर्यंत होती. मात्र या कालावधीत हे टेंडर दिसतच नव्हती. मात्र त्यानंतर म्हणजे १८ जानेवारीनंतर जाहीर प्रकटन दिसू लागले. महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिक जागृती मंचच्यावतीने वॉच ठेवला जातो. त्यांच्या वॉचमध्ये सारे काही उघड झाले. त्याची रितसर तक्रार आज आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत सतीश साखळकर म्हणाले,‘‘ ओपन टेंडर, दोन लिफाफा, विना टेंडर, कोटेशन, वार्षिक पुरवठा तत्त्वावर देण्यात येत आहेत. त्यामुळे यात अधिक पारदर्शकता आणण्याची गरज आहे. या कामांची माहिती त्या त्या प्रभागातील नागरिकांना कळणे आवश्यक आहे. कारण यापुर्वी काम न करताच बिले काढण्याचा प्रकार घडले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी प्रभागातील त्या त्या प्रभागात निघालेल्या टेंडरची माहिती ध्वनीक्षेपकांवरून जाहीर करावीत. म्हणजे नागरिक कामाच्या दर्जावर नियंत्रण ठेवतील. पालिकेच्या व्यवहारात पारदर्शकता येईल.’’
‘‘ पूर्वी अशा काही तक्रारी आल्यानंतर संकेतस्थळावर जाहीर प्रकटनासाठीचे लॉग इन आयडीसह सर्वाधिकार त्या त्या विभागप्रमुखांना देण्यात आले. त्यामुळे संकेतस्थळावर निविदा दिसते किंवा नाही याची सर्वस्वी जबाबदारी त्या त्या विभागप्रमुखांची आहे. आलेल्या संबंधित तक्रारीतील तथ्य तपासण्यात येईल.’’
- नकुल जकाते, सिस्टीम मॅनेजर, महापालिका